Rajesh Tope : आशा सेविकांना अँटिजन टेस्टचं प्रशिक्षण देणार अन् म्यूकरमायकोसिसवर मोफत उपचार; राजेश टोपेंची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 12:49 PM2021-05-25T12:49:09+5:302021-05-25T13:09:13+5:30
Asha workers will train for antigen tests and free treatment for Mucormycosis Rajesh Tope : राज्यात कोरोना रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण आता ९३ टक्क्यांवर पोहोचलं आहे आणि पॉझिटिव्हीटी रेट १२ टक्क्यांवर आला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज प्रसारमाध्यमांना दिली.
राज्यात कोरोना रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण आता ९३ टक्क्यांवर पोहोचलं आहे आणि पॉझिटिव्हीटी रेट १२ टक्क्यांवर आला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज प्रसारमाध्यमांना दिली. राज्यातील कोरोना संदर्भातील आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. यावेळी राजेश टोपे यांनी बैठकीत घेण्यात आलेल्या काही महत्वपूर्ण निर्णयांची माहिती दिली. Rajesh Tope : Asha workers will train for antigen tests and free treatment for Mucormycosis
कोरोना रुग्णांचं प्रमाण कमी होत असलं तरी त्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून कोरोना चाचण्यांसंदर्भात महत्वाचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचं टोपे यांनी सांगितलं. राज्यात उठसूट कुणाचीही कोरोना चाचणी करणं आता पूर्णपणे बंद करण्यासाठीच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील हाय रिस्क आणि कमी धोका असलेल्या व्यक्तींच्याच कोरोना चाचण्या करण्यात येणार आहेत. ठिकठिकाणी कोरोना चाचण्या केल्यानं पॉझिटिव्हीटी रेटवर परिणाम होतो, अशी माहिती राजेश टोपे यांनी यावेळी दिली.
राज्यात कोरोना संदर्भात आशा सेविकांचं योगदान अतिशय महत्वाचं राहिलं आहे. त्यांना आता रॅपिड अँटिजन टेस्टचं प्रशिक्षण देऊन यात त्यांची मदत घेण्यासंदर्भातील निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचं राजेश टोपे म्हणाले. याशिवाय कोरोनासोबतच आता म्यूकरमायकोसिसचा धोका वाढत असताना राज्य सरकारचं बारीक लक्ष या सर्व घडामोडींवर आहे, असं टोपेंनी सांगितलं.
राज्यात सध्या १३१ रुग्णालयांमध्ये म्यूकरमायकोसिसवर उपचार सुरू आहेत आणि येत्या काळात यात आणखी वाढ होईल. यासोबत म्यूकवरवरील उपचार पूर्णपणे मोफत करण्यात येत असल्याची घोषणा राजेश टोपे यांनी यावेळी केली. म्यूकरवरील औषधांचा तुटवडा निर्माण होत असल्याचं लक्षात आल्यानं त्यासाठी ग्लोबल टेंडरसुद्धा काढण्यात आलं आहे. त्याचबरोबर म्यूकरमायकोसिस संदर्भातील कोणतीही लक्षणं दिसल्यानं दुर्लक्ष न करण्याचं आवाहन यावेळी राजेश टोपे यांनी जनतेला केलं आहे.
कोविड रुग्णालयांच्या फायर ऑडिटला प्राधान्य
कोविड संदर्भातील आजच्या बैठकीत सर्वात पहिलं प्राधान्य कोविड रुग्णालयांच्या फायर ऑडिट संदर्भातील निर्णयाला देण्यात आलं असून प्रत्येक जिल्ह्याधिकाऱ्याला जिल्ह्यातील कोविड रुग्णालयांचं फायर ऑडिट प्राधान्यानं पूर्ण करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं. फायर ऑडिट संदर्भातील आवश्यक निधी देखील सरकारनं मंजूर केला आहे. त्यामुळे निधीची कमतरता नाही यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीनं फायर ऑडिट करुण घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
लॉकडाऊन संदर्भातील निर्णय गुरुवारी
राज्यात १ जूनपासून चार टप्प्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू होणार आहे का? याबाबत विचारण्यात आलं असता राजेश टोपे यांनी यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी बैठक घेऊन निर्णय घेणार आहेत, अशी माहिती दिली.