मुंबई - कोरोनाच्या संकटातही आषाढी एकादशीचा उत्साह घराघरात दिसून येत आहे. देशावरील कोरोनाचं संकट लवकर जाऊ दे, पुन्हा एकदा आम्हाला गजबलेलं पंढरपूर पाहू दे... अशीच प्रार्थना लाखो वारकऱ्यांनी आज विठु-माऊलीकडे घरातूनच केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सपत्नीक पहाटे 2.30 वाजता शासकीय विठ्ठल पूजा केली. त्यावेळीही, बा विठ्ठला, कोरोनाचं संकट दूर कर, अशीच प्रार्थना केली. त्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राष्ट्रवादचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही ट्विट करुन आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आषाढी एकादशीनिमित्त राज्यातील सर्वच दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत. तसेच, वारीचं आणि वारकऱ्यांच्या चळवळीचं महत्त्व आणि सांप्रदायिक इतिहासही कथन केला जात आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी राज्यातील जनेतला आणि वारकऱ्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीत ट्विट करुन सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही आषाढीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मराठीत ट्विट
'आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी माझ्या सर्वांना शुभेच्छा. सर्वांना उदंड आनंद आणि चांगले आरोग्य लाभू दे अशी विठ्ठल चरणी प्रार्थना करूया. वारकरी चळवळ ही आपल्या उत्कृष्ट परंपरेचं उदाहरण असून समानता आणि एकता यावर भर देणारी आहे, असेही मोदींनी म्हटलं आहे. पंतप्रधान मोदी हे नेहमीच प्रादेशिक अस्मिता जपतात. देशातील नागरिकांना त्यांच्या भाषेत, त्यांच्या शब्दात आपुलकीने आपलसं करण्याचा त्यांच्या प्रयत्न असतो. आज आषाढी एकादशीनिमित्त पंढरीची वारी आणि वारकऱ्यांची शिकवण मोदींनी जगाला सांगितली आहे.
फडणवीसांकडूनही शुभेच्छा
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विट करुन सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विट करुन त्यांनी व्हिडिओही शेअर केला आहे. अवघीच तीर्थ घडली एकवेळा। चंद्रभागा डोळा देखियला॥ विठ्ठल-रूख्मिणी चरणी नतमस्तक! आषाढी एकादशीच्या अनंत शुभेच्छा..