आषाढी एकादशीला १० मानाच्या पालख्यांसाठी लालपरी धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:05 AM2021-06-20T04:05:47+5:302021-06-20T04:05:47+5:30

मुंबई : कोरोनाचे संकट पाहता, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य शासनाच्या वतीने दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील १० मानाच्या पालख्यांसाठी एस.टी.ची ...

On Ashadi Ekadashi, Lalpari will run for 10 palanquins | आषाढी एकादशीला १० मानाच्या पालख्यांसाठी लालपरी धावणार

आषाढी एकादशीला १० मानाच्या पालख्यांसाठी लालपरी धावणार

Next

मुंबई : कोरोनाचे संकट पाहता, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य शासनाच्या वतीने दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील १० मानाच्या पालख्यांसाठी एस.टी.ची लालपरी धावणार आहे. हा पालखी सोहळा नेत्रदीपक तसेच वारकऱ्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी एस.टी. महामंडळ लालपरी बसेस देणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदाही वारीचा सोहळा साध्या पद्धतीने करण्याच्या सूचना राज्य शासनाने यापूर्वीच दिलेल्या आहेत. त्यानुसार कोरोनाचे संकट असतानाही आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी पायी वारी करण्याऐवजी राज्य सरकारने राज्यातील १० मानाच्या पालख्यांचा सोहळा बसमधून पंढरपूरपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला आहे. १९ जुलै रोजी या बसेस पालख्यांबरोबर पंढरपूरकडे रवाना होतील. त्यासाठी संबंधित संस्थानांना त्यांच्या मागणीप्रमाणे विनामूल्य एस.टी. बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी एस.टी. महामंडळाच्या विभाग नियंत्रकांनी आपल्या जिल्ह्यातील संस्थान विश्वस्तांना प्रत्यक्ष भेटून मानाच्या पालख्यांसाठी एस.टी. महामंडळाच्या बसेस उपलब्ध करून देत असल्याबाबत आश्वस्त करावे, अशा सूचना स्थानिक एस.टी. प्रशासनाला महामंडळाकडून देण्यात आल्या आहेत, असे परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी सांगितले. या पालख्यांचा मूळ ठिकाणापासून पंढरपूर येथील वारीपर्यंतचा प्रवास एस.टी.च्या बसमधून होणार आहे. त्यानंतर या पालख्या वाखरीपासून पुढे चालत पंढरपूरला जातील.

वारकऱ्यांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून सर्व बसेस निर्जंतुकीकरण करण्यात येतील. तसेस प्रवासादरम्यान वारकऱ्यांसाठी सॅनिटायझर आणि मास्कही महामंडळाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येईल, असेही परब यांनी सांगितले.

यंदाही पालख्या पंढरपूरला घेऊन जाण्याचा मान

आषाढी एकदशीनिमित्त अवघ्या वारकरी संप्रदायाला वारी सोहळ्यासाठी श्रीक्षेत्र पंढरपूरची ओढ लागलेली असते. भक्तिरसात चिंब होऊन, विठूनामाचा जयघोष करीत वारकरी पालख्या घेऊन पायी श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला जातात. मात्र, वारी सोहळ्यावर यंदाही कोरोनाचे सावट कायम आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाही मानाच्या पालख्या पंढरपूरला घेऊन जाण्याचा मान एस.टी.ला मिळाल्याबद्दल अनिल परब यांनी समाधान व्यक्त करीत वारकरी संप्रदायाची सेवा करण्याची अशीच संधी मिळो, अशी विठ्ठलचरणी प्रार्थना केली.

Web Title: On Ashadi Ekadashi, Lalpari will run for 10 palanquins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.