बेस्ट समितीवर चौथ्यांदा आशिष चेंबूरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 05:17 AM2018-04-07T05:17:05+5:302018-04-07T05:17:05+5:30
आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाला मार्ग दाखविण्यासाठी शिवसेनेने ज्येष्ठ नगरसेवक आशिष चेंबूरकर यांना बेस्ट समितीचे अध्यक्षपद दिले आहे.
मुंबई - आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाला मार्ग दाखविण्यासाठी शिवसेनेने ज्येष्ठ नगरसेवक आशिष चेंबूरकर यांना बेस्ट समितीचे अध्यक्षपद दिले आहे. त्यांच्या विरोधात ंप्रतिस्पर्धी पक्षातून उमेदवारी अर्ज न आल्याने चेंबूरकर यांची बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीत पीठासीन अधिकारी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी त्यांच्या नावाची घोषणा शुक्रवारी केली. बेस्ट समितीचे अध्यक्षपद चौथ्यांदा भूषविणारे ते पहिलेच नगरसेवक ठरले.
१९९७ मध्ये महापालिका निवडणुकीत आशिष चेंबूरकर निवडून आले. २०१२ पर्यंत ते सलग चार टर्म नगरसेवक होते. या काळात २००२ ते २००५ पर्यंत ते बेस्ट समितीचे अध्यक्ष होते. २०१७ मध्ये ते पुन्हा निवडून आल्यानंतर त्यांना पहिल्या वर्षी स्थायी समितीचे सदस्यपद मिळाले. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्षपदाचे दावेदार मानले जात होते. मात्र त्यांना बेस्ट समितीवर पाठविण्यात आले.
बेस्ट आर्थिक संकटात असल्याने हे सार्वजनिक उपक्रम वाचविण्याचे आव्हान सत्ताधारी शिवसेनेपुढे आहे. अशा वेळी अनुभवी अध्यक्षांची गरज असल्याने चेंबूरकर यांची निवड केल्याचे समजते. बेस्टला नफ्यात आणण्याचे प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी भाषणातून दिले.