Join us

भाजप-शिंदे समन्वयासाठी आशिष कुलकर्णींची नियुक्ती! वाद टाळण्यासाठी पाऊल, कोण आहेत आशिष कुलकर्णी?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 9:28 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यात समन्वयासाठीची जबाबदारी आशिष कुलकर्णी यांच्यावर लवकरच सोपविली जाणार असल्याची माहिती आहे.

मुंबई :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यात समन्वयासाठीची जबाबदारी आशिष कुलकर्णी यांच्यावर लवकरच सोपविली जाणार असल्याची माहिती आहे. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या विजयासाठीची रणनीती निश्चित करण्यात कुलकर्णी यांची महत्त्वाची भूमिका होती. सत्तारूढ दोन पक्षांमधील मुख्य समन्वयक म्हणून ते काम पाहतील.

भाजप आणि शिंदे गटात समन्वय राखण्यासाठी समन्वयकाचे पद निर्माण करण्यामागे दोघांच्या समन्वयातून जनहिताची अधिक चांगली कामे करणे, त्यासाठीचे निर्णय घेणे सोपे जाणार आहे. दोन पक्षांमध्ये कोणतेही गैरसमज होऊ नयेत, वादाचे मुद्दे उपस्थित होऊ नयेत आणि दोन पक्षांमध्ये एकसूत्रता राहावी, यासाठी कुलकर्णी यांची महत्त्वाची भूमिका असेल. मुख्य समन्वयकाचे पद निर्माण करून त्यावर कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यास मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्य सरकार आणि भाजप यांच्यात समन्वयासाठी विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून श्रीकांत भारतीय यांची नियुक्ती केली होती. यावेळीदेखील भाजपमधील एका तरुण नेत्याची या पदावर नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे.

कोण आहेत आशिष कुलकर्णी?आशिष कुलकर्णी हे एकेकाळी काँग्रेसमध्ये पदाधिकारी होते. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे ते अत्यंत निकटवर्ती मानले जात. राणे यांनी काँग्रेस सोडली तरीही कुलकर्णी काही वर्षे काँग्रेसमध्येच होते. दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांशी त्यांचे जवळचे संबंध होते. राहुल गांधी यांच्याशी निकटता होती. मात्र, पुढे त्यांनी काँग्रेस सोडली आणि ते देवेंद्र फडणवीस यांच्याजवळ गेले. आज राज्य भाजपच्या थिंकटँकमध्ये त्यांचे नाव विशेषत्वाने घेतले जाते.राज्यात अलीकडे सत्तांतर झाले तेव्हा ज्या गुप्त हालचाली झाल्या त्यांची माहिती अगदीच मोजक्या नेत्यांना होती, त्यात आशिष कुलकर्णी हे एक होते असे म्हटले जाते.

टॅग्स :एकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीस