मुंबई- गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाचा विजय निश्चित मानला जातो आहे. भाजपाचा विजय सगळीकडेच साजरा केला जातो आहे. मुंबईमध्ये भाजपाच्या विजयाचा जल्लोष केला जातो आहे. यावेळी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विजय सामान्य माणसाला आनंद देणारा आहे. विजयाचं वर्णन करावं तेवढ कमीच आहे. अभूतपूर्वी विजयाचं कारण तीन पायावर चालणारी लंगडी काँग्रेस पराभूत झाली आहे, असं म्हणत आशिष शेलार यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.
या निवडणुकीत प्रचाराची निचतेची पातळी विरोधकांनी ओलांडल्यामुळे आमच्यासाठी हा विजय अभूतपूर्व आहे. विकासाचा नारा घेऊन आणि मोदींच्या नेतृत्वात चालणारी भाजपाची बुलेट ट्रेन विजयी झाली आहे .काँग्रेसनं प्रचारात जनतेला भ्रमित करण्यासाठी जातीयवादाचा सहारा घेतला, त्यामुळे प्रचाराचा मुख्य मुद्दा बाजुला राहिला. या निवडणुकीत आरोपांचा चुकीचा प्रचार करण्यात आला, सामान्य जनतेनं त्यांना त्याचं उत्तर दिलं असल्याचं आशिष शेलार यांनी म्हंटलं. या निवडणूकीपूर्वी काँग्रेसची अवस्था अशी होती, प्रथम त्यांनी नेते बदलले, आता काँग्रेसचे गुजरातमधील नेते पराभूत झाले. त्यांनी नेत्रात नेतृत्वही बदलून टाकले, काँग्रेसनं उमेदवारही बदलले. घोषित केलेले उमेदवार बदलण्याचं काम त्यांनी केलं. शेवटी जनतेनं काँग्रेसला बदलले, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.
सोमवारी सकाळी गुजरातमध्ये भाजपाचा विजय जवळपास निश्चित झाल्यावर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. मोदीजी तुम आगे बडो, हम तुम्हारे साथ है. देश का नेता कैसा हो, मोदींजी जैसा हो अशा पद्धतीच्या घोषणा विजयानंतर भाजपाच्या मुंबई कार्यालयाबाहेर देण्यात येत आहेत.