मुंबईतील प्रदूषणाला उबाठा जबाबदार, आशिष शेलार यांचा आरोप
By जयंत होवाळ | Published: October 27, 2023 08:12 PM2023-10-27T20:12:11+5:302023-10-27T20:15:43+5:30
Ashish Shelar News: मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी कागदावर आरेला जंगल म्हणून घोषित केले.
- जयंत होवाळ
मुंबई - मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी कागदावर आरेला जंगल म्हणून घोषित केले आणि प्रत्यक्षात मुंबईत बिल्डरांना प्रिमियमची खैरात केली. त्यामुळे आजघडीला मुंबईत सहा हजार बांधकाम प्रकल्प एकाच वेळी सुरु झाले. मुंबईत आज जे प्रदूषण होत आहे, त्यास ठाकरे जबाबदार आहेत, असा आरोप त्यांनी केला.
आदित्य ठाकरे यांनी मुंबईत आरेला जंगल घोषीत केले आणि स्वत:ची पाठ स्वत:च थोपटून घेतली. पण ही घोषणा कागदावर असून प्रत्यक्षात उबाठाकडून मुंबईत बिल्डरांसाठी गेल्या १० वर्षांत सुमारे ३८ हजार ९९९ झाडांची कत्तल करण्यास परवानगी दिली. जी मेट्रो वाहनांची संख्या कमी करुन हवा प्रदुषण कमी करणार आहे ती मेट्रो आणि तीच्या कारशेडचे काम रोखून ठेवले. मुंबईतील कचऱ्यापासून गॅसची निर्मिती केली तर सुमारे ३५० कोटी रुपयांचा नैसर्गिक गॅस मुंबईला उपलब्ध होईल, पण त्यासाठी एक रुपयाचीही तरतूद केली नाही. उलट गरज नसताना पर्यावरणाचा समतोल बिघडवणाऱ्या समुद्राचे पाणी गोडे करणाऱ्या प्रकल्पाची तयारी सुरु केली, असे शेलार म्हणाले.
माहुलच्या प्रदुषणकारी कंपन्या स्थलांतरीत करण्याची मागणी आहे. पण तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि उबाठा सरकारने प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांना राष्ट्रीय हरित लवादाने ठोठावलेला १४ हजार कोटींच्या दंडात सवलत देऊन तो ३०० कोटींवर आणला आणि त्यालाही स्थगिती दिली. याबाबत आपण मागिल काळात विधानसभेचे लक्ष वेधून सरकारकडे चौकशीची मागणीही केली होती, असेही शेलार म्हणाले.