Join us

शेलार बंधू विधानसभेच्या रिंगणात; आशिष शेलारांसह त्यांच्या मोठ्या भावालाही भाजपची उमेदवारी

By मनोहर कुंभेजकर | Published: October 20, 2024 4:48 PM

भाजपने आशिष शेलार यांना वांद्रे पश्चिममधून तर त्यांचे बंधू विनोद शेलार यांना मालाड पश्चिममधून उमेदवारी जाहीर केली आहे.

मुंबईभाजपने आज आपली पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये २०१४ पासून सलग दोन वेळा आमदारकीची निवडणूक लढवणारे विद्यमान भाजप आमदार व मुंबई भाजप अध्यक्ष ऍड.आशिष शेलार यांना पुन्हा एकदा वांद्रे पश्चिममधून उमेदवारी जाहीर झाली आहे. विशेष म्हणजे, आशिष शेलार यांचे मोठे भाऊ असलेले भाजप प्रदेश प्रवक्ते आणि मुंबई भाजप सचिव विनोद शेलार यांना मालाड पश्चिममधून पहिल्यांदाच उमेदवारी देण्यात आली आहे.

२०१२ ते २०१७ मध्ये नगरसेवकपद भूषवणारे विनोद शेलार पहिल्यांदाच आमदारकीची निवडणूक लढवणार आहे. त्यामुळेच मुंबईत यंदा लहान भाऊ आणि मोठा भाऊ एकत्र निवडणूक लढवणार आहेत.

मालाड पश्चिममधून भाजप युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवानादेखील निवडणूकीच्या रिंगणात होते, मात्र त्यांची मनधरणी करत पक्षाने विनोद शेलार यांना निवडणुकीचे तिकीट दिले. २००९ पासून सलग तीन वेळा मालाड पश्चिमचे विद्यमान कॉंग्रेसचे आमदार व माजी मंत्री अस्लम शेख यांना शेलार यांचे यंदा मात्र कडवे आव्हान असेल.

विनोद शेलार यांचे २०१९ मध्ये नाव येथे चर्चेत होते, मात्र काँग्रेसचे माजी आमदार रमेशसिंग ठाकूर यांनी भाजपात प्रवेश केला आणि त्यांना मालाड पश्चिममधून पक्षाने तिकीट दिले. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. गेली १० वर्षे विनोद शेलार यांनी हा मतदार संघ बांधला आहे. त्यांचे काम पाहून पक्षांने यंदा त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४भाजपाआशीष शेलारमुंबई