'यमका' साठी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न कशाला करताय, संजय राऊतांच्या खोचक ट्विटला आशिष शेलारांचं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2018 11:25 AM2018-02-17T11:25:55+5:302018-02-17T12:29:36+5:30

"मोदी"या शब्दाचे यमक जुळवून टुकार काव्य प्रभादेवीच्या गल्लीत बसून काहींना सूचले... तेव्हाच कळले आता "शिमगा" जवळ आलाय!

Ashish Shelar answers Sanjay Raut's criticism on Narendra Modi | 'यमका' साठी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न कशाला करताय, संजय राऊतांच्या खोचक ट्विटला आशिष शेलारांचं उत्तर

'यमका' साठी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न कशाला करताय, संजय राऊतांच्या खोचक ट्विटला आशिष शेलारांचं उत्तर

Next

मुंबई - उगाच "यमका" साठी सुर्यावर थुंकण्याचा प्रयत्न कशाला करताय,तीच थुंकी आपल्या तोंडावर पडू नये म्हणजे झाले!!!' अशा शब्दांत भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या खोचक ट्विटला उत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी मोदी आडनावाचा फायदा घेत नीरव मोदीच्या नावे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. ललित मोदी आणि निरव मोदी हे दोघे देश सोडून पळून गेले...तिसरा येऊन जाऊन असतो असं ट्विट संजय राऊत यांनी केलं होतं. पंजाब नॅशनल बँकेतील ११,३00 कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी यांच्या नावामुळे अनेकजण पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्याची संधी साधत आहेत. 

संजय राऊत यांनी नीरव मोदींच्या निमित्ताने नरेंद्र मोदींवर टीका करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी एक ट्विट करत त्यांनी 'पैसे बॅंक मे रखो तो नीरव मोदी का डर..घर मे  रखो तो नरेंद्र मोदी का..' अशी खोचक टीका केली होती. संजय राऊत यांच्या टीकेमुळे भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्विट करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 


"मोदी"या शब्दाचे यमक जुळवून टुकार काव्य प्रभादेवीच्या गल्लीत बसून काहींना सूचले... तेव्हाच कळले आता "शिमगा" जवळ आलाय! तसा वर्षभरच यांचा शिमगाच असतो म्हणा!! उगाच "यमका" साठी सुर्यावर थुंकण्याचा प्रयत्न कशाला करताय,तीच थुंकी आपल्या तोंडावर पडू नये म्हणजे झाले!!!' असं ट्विट करत आशिष शेलारांनी संजय राऊत यांना सुनावलं आहे.


दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून मोदी सरकारवर घणाघाती टीका करत नीरव मोदीला रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर करा अशी उपरोधिक टीका केली आहे. कर्जाचा हप्ता फेडता न आल्याने कर्जात डुबून शेतकरी आत्महत्या करतो तर दुसरीकडे राष्ट्रीयकृत बँकांची दीड लाख कोटींची लूट करणारे दरोडेखोर सरकारी कृपेने सुखरूप आहेत, अशा शब्दात सामना संपादकीयमधून मोदी सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. शे-पाचशे रुपये कर्जाचा हप्ता फेडता येत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतो. त्याच्या घरादारावर जप्तीचा नांगर फिरतो, पण देशातील बनेल उद्योगपतींनी राष्ट्रीयीकृत बँकांची दीड लाख कोटींची लूट केली व ते सगळे दरोडेखोर सरकारीकृपेने ‘सुखरूप’ आहेत. देश सध्या जाहिरातबाजीवर चालला आहे. प्रसिद्धी व जाहिरातबाजीवर हजारो कोटी खर्च सुरू आहे. देशलुटीच्या कथा आणि दंतकथा रघुरामन राजन यांनी समोर आणल्या तेव्हा त्यांना रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदावरून घालवण्यात आले. आता रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदावर नीरव मोदीलाच बसवा, म्हणजे देशाची अखेरची निरवानिरव करता येईल!, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.
 

Web Title: Ashish Shelar answers Sanjay Raut's criticism on Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.