भाजपचे नेते आणि माजी मंत्री आशिष शेलार यांनी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीवरुन शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. मुंबई महापालिका निवडणूकीची चर्चा सुरू झाल्यापासून शिवसेनेची कटकारस्थानं सुरू आहेत, असा आरोप शेलार यांनी केला आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. Ashish Shelar challenges Shiv Sena for Mumbai Municipal Corporation elections
"मुंबई भाजप सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून आहे. आपली हार लक्षात घेता शिवसेनेनं निवडणुकीपासून पळवाट काढायची तयारी सुरू केली आहे. कोरोनाचं कारण देऊन मुंबई महानगरपालिकेची निवडणूक दोन वर्षांनी पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा डाव आहे", असा खळबळजनक आरोप आशिष शेलार यांनी यावेळी केला आहे. याशिवाय, कोरोनाचे सर्व नियम पाळून निवडणूक आयोगानं ठरवलं आणि निवडणूक वेळेतच घेतली तरी भाजप पूर्ण तयार आहे हे सांगताना शेलार यांनी बॉलिवूड स्टाइल डायलॉगची आठवण करुन देत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. "सामनामध्ये दररोज डायलॉगबाजी केली जाते. आज आम्हीही शिवसेनेला त्यांच्याच भाषेत सांगतो, बंदूक भी तेरी, गोली भी तेरी, दिन-तारीख भी तेरी, दिन कहे दिन, शाम कहे शाम, शिवसेना को परास्त करने भाजप तयार है", असं शेलार म्हणाले.
शिवसेनेकडून ३० वॉर्ड फोडण्याचा प्रयत्नमुंबई महापालिकेतील जे ३० वॉर्ड आपण कधीच जिंकू शकत नाही अशा वॉर्डला टार्गेट करुन तिथं फोडाफोडी करण्याचा डाव शिवसेनेनं आखला आहे, असंही शेलार म्हणाले. याशिवाय जनगणनेचं कारण देऊन मुंबईतील वॉर्ड रचना बदलण्याचं कारस्थान सत्ताधारी शिवसेनेकडून रचलं जात आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.
कोरोनाच्या नावाखाली अनेक गोष्टी सुरू आहेत. २०११ च्या जनगणेनुसार २०१७ ची प्रभागरचना झाली, मग आता त्याच जनगणनेनुसार २०२२ मध्ये प्रभागरचना का? जनगणना करता येणार नाही, नव्याने मतदार नोंदणी करताना जास्त वेळ लागेल, असा त्यामागचा डाव आहे. जितकं करता येईल तितकं निवडणूक पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे, असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.