मुंबई - आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आपल्या नेतृत्वात मोठा बदल करत मुंबईचे प्रदेशाध्यक्षपद आशिष शेलार यांच्याकडे सोपवले आहे. दरम्यान, आशिष शेलार यांनी भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवताच आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबई महानगरपालिकेमधून उद्धव ठाकरेंच्या भ्रष्टाचारी शिवसेनेला तडीपार करून पालिकेत भाजपाचा महापौर बसवणार, अशी गर्जना आशिष शेलार यांनी केली आहे.
आशिष शेलार म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेत आणि मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने भ्रष्टाचाराची जी बजबजपुरी केली त्याला तडीपार करण्याचं काम मी आणि माझे सहकारी करू. आजच सर्व विषय बोलणार नाही. दिवस पावसाचे आहेत. पण वारंवार वर्षांनुवर्षे ज्या कंत्राटदारांना पोसलं आणि कंत्राटदारांनी ज्यांना पोसलं ते खड्ड्यांपासून हा झटकू शकत नाहीत. सांडपाणी निविदेत दिरंगाई आणि घोळ यातून शिवसेनेचे नेते हात झटकू शकत नाहीत. निकृष्ट दर्जाचं कोस्टल रोडचं काम, मेट्रो-३ मध्ये केलेला अहंकार यामुळे मुंबईकरांच्या डोक्यावर जो भुर्दंड टाकला आहे. त्यापासून शिवसेना हात झटकू शकत नाही, असा टोला शेलार यांनी लगावला.
ते पुढे म्हणाले की, गेल्या २५ वर्षांत मुंबईबाबत तुम्ही जे चित्र तुम्ही डोक्यात रंगवलंय, मनात जपलंय ते साकारण्याचं काम भाजपा करेल. आम्हाला मुंबईकरांचे आशीर्वाद निश्चितच मिळेल. आमचं ठरलंय, भ्रष्ट व्यवस्थेनं बरबटलेल्या उद्धवजींच्या शिवसेनेला मुंबईतून तडीपार करायचं आहे आणि मुंबईकरांच्या मनातील स्वप्नातील खऱ्या विकासाच्या मुंबईचं चित्र रंगवून मुंबईकरांना सुपूर्द करायचं आहे. मुंबई महानगरपालिकेत आमचं टार्गेट हे महापौरपद आहे. त्याबाबत आवश्यक नगरसेवक निवडून आणू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.