Join us

आगामी बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या निवडणुकीसाठी आशिष शेलार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 4:23 AM

मुंबई : माझ्या सोबत असणारा माझा अनुभव हीच माझी ताकद असल्याने आगामी बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाची निवडणूक आम्हीच जिंकू, ...

मुंबई : माझ्या सोबत असणारा माझा अनुभव हीच माझी ताकद असल्याने आगामी बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाची निवडणूक आम्हीच जिंकू, हे निश्चित असल्याचे आमदार ॲड. आशिष शेलार म्हणाले. मुंबईत बीकेसी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ३ फेब्रुवारी रोजी गुरुग्राम येथे बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्ष पदासाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी आशिष शेलार रिंगणात उतरले आहेत.

या वेळी शेलार म्हणाले, भारतीय बॉक्सिंग क्षेत्रात आम्हाला बदल घडवायचा आहे. काही त्रुटींमुळे तसेच अनेक निर्णय उशिरा घेतल्यामुळे रिओ ऑलिम्पिकच्या बॉक्सिंग स्पर्धांमध्ये आपण कमी पडलो. या त्रुटी आम्ही निवडून आल्यास भरून काढणार आहोत. भारतातील तळागळातील खेळाडूंना सक्षम करण्याचे आमचे ध्येय आहे. या सर्व गोष्टी भारतातील सर्व राज्यातील बॉक्सिंग असोसिएशनला सोबत घेऊनच करायच्या आहेत, असे त्यांनी सांगितले. भारतीय बॉक्सिंगला स्पॉन्सर मिळणे कठीण जात आहे. त्यामुळे बॉक्सिंगसाठी टायटल स्पॉन्सर आणण्यासाठी आमच्याकडून विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. विरोधकांनी आमच्या समोर आधीच हार मानली आहे. मागील अनेक दिवसांपासून निवडणुकीची तारीख पुढे ढकलणे तसेच निवडणुकीत विविध अडथळे आणण्याचे काम विरोधक करीत होते.

मी मुंबईतील कीर्ती कॉलेजचा विद्यार्थी असल्याने कॉलेज जीवनापासूनच क्रीडा क्षेत्राशी माझा जवळचा संबंध आहे. त्यानंतर मी मुंबई क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष राहिलो आहे. २०१६ साली वर्ल्ड ट्वेंटी ट्वेंटीच्या कमिटीचा सदस्य राहिलो आहे. त्याचप्रमाणे मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनचा चेअरमनदेखील राहिलो आहे. माझ्यासोबत माझा अनुभव आहे त्याचप्रमाणे माझे केंद्र सरकारसोबत चांगले संबंध असल्याने बॉक्सिंगला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणे हे माझे ध्येय असल्याचे ते म्हणाले. या वेळी बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे संस्थापक सदस्य जय कवळी, सरचिटणीस अनिल कुमार मिश्रा, डॉक्टर सी. बी. राजे, राजेश देसाई व असित बॅनर्जी उपस्थित होते.