Join us

आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट; विधानपरिषदेच्या जागेवरून निर्माण झालेला तिढा सुटणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 9:43 PM

मनसेकडून पानसे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने महायुतीत मिठाचा खडा पडला आहे.

Ashish Shelar ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने मनसे आणि भाजपमध्ये संघर्ष रंगत असल्याचं दिसत आहे. कारण कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेनं अभिजीत पानसे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपचे निरंजन डावखरे हे गेली दोन टर्मचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहेत. असं असताना मनसेकडून पानसे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने महायुतीत मिठाचा खडा पडला आहे. या पार्श्वभूमीवर तोडगा काढण्यासाठी भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे.

विधानपरिषद निवडणुकीत मनसेसोबत संघर्ष झाल्यास याचे पडसाद आगामी विधानसभा निवडणुकीतही उमटण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा संघर्ष टाळण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात असल्याचं दिसून येत असून या प्रयत्नांचा एक भाग म्हणूनच आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत कोकण पदवीधर मतदारसंघावरून सुरू असलेला मनसे-भाजपमध्ये वाद मिटणार का, हे पाहावं लागेल.

विधानपरिषद निवडणुकीचा कसा असेल कार्यक्रम?

विधान परिषदेच्या मुंबई व कोकण पदवीधर तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी पुढे ढकललेला निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम शुक्रवारी निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानुसार चार जागांसाठी येत्या २६ जून रोजी मतदान होणार असून,  मतमोजणी १ जुलै रोजी होणार आहे. विधानपरिषदेत मुंबई पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे उद्धवसेनेचे विलास पोतनीस, कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे निरंजन डावखरे, मुंबई शिक्षकचे कपिल पाटील व नाशिक शिक्षकचे किशोर दराडे यांची सदस्यत्वाची मुदत ७ जुलै २०२४  रोजी संपत आहे. त्यामुळे या चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. 

दरम्यान, लोकसभेला एकत्र आलेले पक्ष विधान परिषदेच्या निवडणुकीत एकमेकांविरोधात उमेदवार उभे करू लागले आहेत. काँग्रेसला जागा हवी असताना उद्धव ठाकरेंनी उमेदवार जाहीर केला आहे. तर भाजपाच्या जागेवर काही दिवसांपूर्वीच मोदींना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा देणाऱ्या व त्यांच्यासोबत सभा घेणाऱ्या राज ठाकरेंनी उमेदवार जाहीर केला आहे. आता भाजप निरंजन डावखरेंना मनसेविरोधात लढविणार का, हे पाहावं लागेल. 

टॅग्स :आशीष शेलारमनसेराज ठाकरेभाजपा