मुंबई - माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्याबाबत आज एक मोठा गौप्यस्फोट केला होता. २०१४ नंतर शिवसेनेने काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्य़ाचा प्रस्ताव दिला होता. तो प्रस्ताव घेऊन आलेल्या शिष्टमंडळात एकनाथ शिंदे यांचाही समावेश होता, असा दावा करत अशोक चव्हाण यांनी खळबळ उ़डवून दिली आहे. दरम्यान, अशोक चव्हाण यांच्या या वक्तव्यानंतर भाजपा नेते आशिष शेलार यांनीही चव्हाण यांना सूचक इशारा दिला आहे.
अशोक चव्हाणांची ती क्लीप व्हायरल केली तर त्यांची अडचण होईल, असे भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटले आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आशिष शेलार म्हणाले की, अशोक चव्हाणांची ती एक क्लिप जर आम्ही व्हायरल केली तर त्यांची अडचण होईल, अशोक चव्हाण आमचे मित्र आहेत. आम्ही त्यांची अडचण करू पाहत नाही. मला वाटतं की ज्यामध्ये काही राजकीय संदेश, काही प्रथा परंपरा असतात. त्या प्रथा परंपरांचा आम्ही भंग करणार नाही. त्यांच्या जीवनावर व्यक्तिगट टीकाटिप्पणी करणार नाही. मात्र त्यांच्या राजकीय घडामोडींबाबत नक्की बोलू शकतो, असा सूचक इशारा आशिष शेलार यांनी दिला आहे.
अशोक चव्हाण म्हणाले होते की, भाजपा-शिवसेना युती काळात शिवसेनेने युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावेळी भेटलेल्या शिवसेनेच्या शिष्टमंडळात एकनाथ शिंदेंचाही समावेश होता. शिवसेना नेत्यांची आणि माझी मुंबईतील कार्यालयात भेट झाली होती. भाजपासोबत राहायचे नाही अशी भूमिका शिवसेनेने घेतली होती. २०१९ च्या निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतरही शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आली, त्यामुळे अनेकांना धक्का बसला. परंतु ही भूमिका देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाची होती असा गौप्यस्फोट त्यांनी केला होता.