Maharashtra Assembly Election Result 2024: मालाड पश्चिममध्ये अस्लम शेख यांच्याकडून आशिष शेलारांच्या भावाचा पराभव; सलग चौथ्यांदा विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 04:30 PM2024-11-23T16:30:32+5:302024-11-23T16:31:03+5:30
Maharashtra Assembly Election Result 2024: या ठिकाणी आमदार आशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलार यांना भाजपकडून संधी मिळाली होती. तर त्यांच्यासमोर काँग्रेसकडून विद्यमान आमदार अस्लम शेख यांना पुन्हा संधी देण्यात आली होती.
Maharashtra Assembly Election Result 2024: मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघांपैकी एक आहे. हा मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातील बोरिवली, मगाठाणे, दहिसर, कांदिवली पूर्व आणि चारकोप या पाच विधानसभा मतदारसंघांसह उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात हा मतदारसंघ येतो. आमदार आशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलार यांना भाजपकडून संधी मिळाली होती. तर त्यांच्यासमोर काँग्रेसकडून विद्यमान आमदार अस्लम शेख यांना पुन्हा संधी देण्यात आली होती. यामध्ये पुन्हा एकदा अस्लम शेख यांनी विजय मिळवत शेलार यांचा पराभव केला. याची अद्याप अधिकृत घोषणा होणं शिल्लक आहे. त्यांनी ६ हजारांहून अधिक मतांनी पराभव केल्याचं समोर येतंय.
मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचं वर्चस्व राहिले आहे. अस्लम शेख हे २००९ पासून सलग तिसऱ्यांदा काँग्रेसचे आमदार आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अस्लम शेख ५० टक्के मतं मिळवून विजयी झाले होते. ते सुमारे दहा हजार मतांनी विजयी झाले. भाजपचे रमेशसिंह ठाकूर ६९ हजार मतांसह दुसऱ्या क्रमांकावर होते.
२०१९ चा निकाल काय?
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सर्व प्रमुख पक्ष स्वबळावर निवडणुकीला सामोरे गेले होते, तेव्हा अस्लम शेख अवघ्या २,३०३ मतांनी विजयी झाले होते. भाजपचे राम बारोट दुसऱ्या क्रमांकावर होते. शिवसेनेचे डॉ. विनय जैन तिसऱ्या क्रमांकावर राहिले. मनसेचे दीपक पवार यांनी निवडणूक लढवली पण ते चौथ्या क्रमांकावर राहिले. राष्ट्रवादीचे सुनील शिंदे यांना अपक्ष उमेदवार आणि 'नोटा'पेक्षा कमी मतं मिळाली होती. केवळ तीन अंकी मतांसह ते सातव्या स्थानावर घसरले.
अस्लम शेख यांचं वर्चस्व
२००९ मध्ये अस्लम शेख यांनी ४३ टक्के मतं मिळवून सुमारे २८ हजार मतांनी विजय मिळवला होता. भाजपचे आरयू सिंह दुसऱ्या क्रमांकावर होते. मनसेच्या नीला देसाई तिसऱ्या, तर अपक्ष उमेदवार दीपक पवार चौथ्या स्थानावर राहिले होते.