Ashish Shelar Raj Thackeray: लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज ठाकरे हे आमचे मित्र आहेत. त्यातही ते एक कलाकार आहेत, कलेवर प्रेम करणारा माणूस आहे. त्यांच्याबरोबर वाद, संवाद, चर्चा-विमर्श करायला आपल्याला आवडते आणि आनंदही मिळतो. त्यामुळे उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, शरद पवार या तिघांपेक्षा आपल्याला राज ठाकरे यांच्याबरोबर बंद दाराआड अडकायला आवडेल. कारण त्यांच्याबरोबर नकलांपासून अकलेपर्यंत सर्व प्रकारची मेजवानी मिळेल, असे राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले. पार्ल्यात झालेल्या एका कार्यक्रमात अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. गुढीपाडव्याचे औचित्य साधून मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या कलाकारांनी विले पार्ले येथे विशेष कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी कलाकार आणि त्यांच्या मित्रमंडळींनी नटूनथटून एकत्र येत उत्सवी वातावरणात गुढी उभारली. यावेळी अभिनेते स्वप्निल जोशी, सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक, अंकुश चौधरी, सुव्रत जोशी, प्रार्थना बेहेरे, अमृता खानविलकर, सुशांत शेलार, रिंकु राजगुरू, सुबोध भावे, आदिनाथ कोठारे यांच्यासोबत प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार उपस्थित होते. यावेळी बंद दाराआड अडकलेल्या नायक-नायिकांच्या सुशीला-सुजित या चित्रपट कथेवर आधारलेले प्रश्न प्रसाद ओक यांनी शेलार यांना विचारले.
तुम्ही कुणाबरोबर असे अडकलात, तर ते कोण असावे असे वाटते,’ असा प्रश्न करून शेलार यांच्यासमोर उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे की शरद पवार? असे तीन पर्याय ठेवण्यात आले. त्यावर शेलार यांनी हसतखेळत या तिघांऐवजी राज ठाकरे यांचे नाव सांगितले. मराठी प्रेक्षकांनी घरात अडकून न राहता मराठी चित्रपटांना पाठबळ देण्यासाठी सिनेमागृहापर्यंत यायला हवे. चित्रपट कथेतील सुखदुःखे पाहून स्वतःच्या मनातील प्रश्नांची उत्तरे शोधायचा प्रेक्षक प्रयत्न करतात, असेही मंत्री शेलार यांनी सांगितले.