मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत होत आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलेच राजकारण सुरु झाले आहे. यातच आता भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी डॉक्टरांनी आपल्या वेतनासंदर्भात मांडलेल्या व्यथा असलेले व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत मुंबई महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठविली.
आशिष शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, " 33,441कोटींचा अर्थसंकल्प असणाऱ्या मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात 'कोरोना वॉरियर्स' म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या डॉक्टरांना दरमहा केवळ, 14 हजार 800 असे तुटपुंजे मानधन दिले जातेय??? ऐका या डॉक्टरांच्या व्यथा, पालिकेतील सत्ताधिशांच्या नाकर्तेपणाच्या कथा!"
याचबरोबर, आणखी एका व्हिडीओत डॉक्टरांनी आपल्या मागण्यांसाठी प्रशासनाकडे विनंती केली आहे. यासंदर्भातील व्हिडीओ आशिष शेलार यांनी पोस्ट केला आहे. यावेळी "कोण बघणार या डॉक्टरांच्या प्रश्नांकडे...युद्धजन्य परिस्थितीत डॉक्टरांना आपल्या हक्कासाठी आंदोलन करावे लागतेय? असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे. याशिवाय, कुठे आहेत आरोग्य समिती अध्यक्ष? "स्टॅंडिंगमध्ये अंडरस्टँडिंग" करणारे कुठे आहेत ते स्टॅंडिंग कमिटीचे चेअरमन? असेही सवाल करत कोरोनाचा थरार...पालिकेतील सत्ताधारी फरार!, अशा शब्दांत पालिकेच्या सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, याआधी आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेच्या कारभारावर टीका केली आहे. 80 हजार कोटींच्या ठेवी असलेल्या श्रीमंत मुंबई महापालिकेचा कारभार उघडा पडला आहे. रुग्णांची अवस्था अत्यंत वाईट असून नर्स नाहीत, ॲम्बुलन्स नाहीत, डॉक्टर नाहीत, हॉस्पिटलमध्ये खाटा उपलब्ध नाहीत, व्हेंटिलेटर नाहीत, अशा अवस्थेत मुंबईकरांना सोडून पालिकेतील सत्ताधारी फरार आहेत, असे दुर्दैवी चित्र मुंबईत पाहायला मिळते आहे, असा आरोप आशिष शेलार यांनी केला होता.