एक वटवृक्ष वाचवून युवा नेत्यांनी केवढं कौतुक करुन घेतलं, पण..; आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 03:48 PM2020-07-28T15:48:41+5:302020-07-28T15:58:21+5:30
भाजपाने नेते आशिष शेलार यांनी ट्विटरच्या माध्यमातून आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
मुंबई : मिरज ते पंढरपूर मार्गावरील भोसे (ता. मिरज) येथील ४०० वर्षांचा वटवृक्ष वाचवण्यासाठी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नियोजित राष्ट्रीय महामार्गात सुधारणा करावी, अशी विनंती त्यांनी पत्राद्वारे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना केली होती. तसेच, सोशल मीडियातही अनेक पर्यावरण प्रेमींनी हा वटवृक्ष तोडण्यास विरोध केला होता. त्यानंतर नितीन गडकरींनी प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गाचा नकाशा बदलण्याचे आदेश दिले. यामुळे आदित्य ठाकरेंचे अनेकांनी कौतुक केले. यावरून भाजपाने नेते आशिष शेलार यांनी ट्विटरच्या माध्यमातून आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
४०० वर्षे जुना एक वटवृक्ष वाचवून युवा नेत्यांनी केवढं कौतुक करुन घेतले, पण मुंबईत काय सुरु आहे? असा सवाल करत आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंना लक्ष्य केले आहे. "४०० वर्षे जुना एक वटवृक्ष वाचवून युवा नेत्यांनी केवढं कौतुक करुन घेतलं! पण मुंबईत काय सुरु आहे... ? लॉकडाऊन मध्ये १२८२ झाडांची कत्तल करण्याचे प्रस्ताव मंजूर झाले आता अजून ६३२ झाडे तोडणे किंवा प्रत्यारोपण करण्याचा प्रस्ताव तयार!! मुंबईत झाडांचा कत्तलखानाच सुरु आहे!", असे ट्विट आशिष शेलार यांनी केले आहे.
400 वर्षे जुना एक वटवृक्ष वाचवून युवा नेत्यांनी केवढं कौतुक करुन घेतलं!
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 28, 2020
पण मुंबईत काय सुरु आहे... ?
लॉकडाऊन मध्ये 1282 झाडांची कत्तल करण्याचे प्रस्ताव मंजूर झाले आता अजून 632 झाडे तोडणे किंवा प्रत्यारोपण करण्याचा प्रस्ताव तयार!!
मुंबईत झाडांचा कत्तलखानाच सुरु आहे!
दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ मिरज ते पंढरपूर दरम्यान भौसे येथून जातो. गावातील गट क्रमांक ४३६ येथे यलम्मा देवीचे मंदिर असून त्यासमोर ४०० वर्षे जुना वटवृक्ष आहे. या वटवृक्षाचा विस्तार ४०० चौरस मीटर इतका आहे. हा वटवृक्ष ऐतिहासिक ठेवा असून तो वटवाघूळ आणि इतर दुर्मिळ पक्षांसाठी नैसर्गिक निवासस्थानदेखील आहे, असे आदित्य ठाकरेंनी नितीन गडकरींना लिहिलेल्या पत्रात नमूद केले होते. वटवृक्षाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन संबंधित जागेवरील महामार्गात काही बदल करून वटवृक्षाचे जतन करण्याची विनंती आदित्य ठाकरेंनी केली होती. त्यानंतर या पत्राची आणि स्थानिकांच्या मागणीची दखल घेत नितीन गडकरींनी राष्ट्रीय महामार्गाचा नकाशा बदलण्याचे आदेश दिले आहेत.
आणखी बातम्या...
राणेंवर बोलल्याशिवाय 'मातोश्री' बिस्कीट टाकत नाही असा समज, पण...; नितेश राणेंची बोचरी टीका
कोरोनापासून बचावासाठी डॉक्टरचा 'देसी जुगाड'; रुग्णांवर असा केला जातोय उपचार
अयोध्येतील राम मंदिरासाठी ५ कोटींची देणगी, प्रसिद्ध कथावाचक मोरारी बापूंची घोषणा
राफेलच्या स्वागतासाठी अंबाला हवाईतळावर जय्यत तयारी, ३ किमीचा परिसर ड्रोन झोन घोषित
पब्जीसह २७५ चिनी अॅप्सवर बंदी? सरकार चीनला पुन्हा दणका देण्याच्या तयारीत
'ये दोस्ती... हम नही तोडेंगे...', संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा!