Join us

आशिष शेलार मांत्रिकांच्या संपर्कात?; पुरावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने फोटो केला ट्विट, हा बघा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 3:10 PM

युतीतील जागावाटपाबाबत अमित शहा यांनी चर्चेची माहिती नरेंद्र मोदी यांना न देता त्यांना अंधारात ठेवल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता.

मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेच्या तिढ्यात भाजपा आणि शिवसेना यांच्यात टोकाचा वाद निर्माण झाला आहे. एनडीएपासून शिवसेनेने फारकत घेत राज्यात महाशिवआघाडीचं नवीन समीकरण उदयास येऊ लागली आहे. त्यामुळे राज्यात १०५ जागा जिंकूनही हतबल असलेल्या भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. संजय राऊत यांच्यावर टीका करताना आशिष शेलार यांनी एक विधान केलं होतं. 

युतीतील जागावाटपाबाबत अमित शहा यांनी चर्चेची माहिती नरेंद्र मोदी यांना न देता त्यांना अंधारात ठेवल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यावर आशिष शेलार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात विसंवाद निर्माण करण्यासाठी रोज एकपात्री वगनाटयाचा प्रयोग सुरू आहे. संजय राउत यांनी अमित शहा, पंतप्रधान मोदी यांना शिवसेनेपासून दूर करण्याचा प्रयत्न केला आहे असं त्यांनी सांगितले होते. 

त्याचसोबत मोदी आणि बाळासाहेबांचे एक खास नाते होते. हे नाते मोदी पंतप्रधान होण्याआधीपासूनचे होते. मात्र आता एक अदृश्य शक्ती मोदी आणि उद्धव ठाकरेंमध्ये फूट पाडू इच्छित असल्याचे शेलार म्हणाले. शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची साथ मिळत असल्याचं चित्र असल्याने आशिष शेलारांचा हा टोला विरोधकांनाही होताच त्यामुळे शेलारांना जितेंद्र आव्हाडांनी टोला लगावला. टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले होते की, कदाचित ते मांत्रिकांच्या संपर्कात असतील, तंत्रमंत्र केलं असेल, त्याने सांगितलं असेल अदृश्य शक्ती येईल मात्र या गोष्टींवर आमचा विश्वास नाही, आमच्या मनात शक्ती आहे, प्रचंड बलवान आणि एकनिष्ठ अशा शक्ती असतात. स्वत:चे विचार त्याच विश्वासावर आम्ही पुढे जातो असं विधान केलं होतं. 

आव्हाडांच्या या विधानानंतर ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ट्विटरवर एक फोटो अपलोड केला आहे. त्यात आशिष शेलार एका मांत्रिकासोबत असल्याचा दावा केला आहे. त्याला पुरावा म्हणून लिहिण्यात आलं आहे. मात्र हा फोटो कधीचा आहे, किंवा शेलारांसोबत असलेला व्यक्ती मांत्रिक आहे का? याबाबत कोणतीही स्पष्टता नाही.  

टॅग्स :जितेंद्र आव्हाडआशीष शेलारराष्ट्रवादी काँग्रेसभाजपाशिवसेना