Ashish Shelar: '....यातून उद्धव ठाकरेंनी थोडं शिकलं पाहिजे', आशिष शेलार यांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 03:27 PM2023-07-15T15:27:01+5:302023-07-15T15:27:33+5:30
Ashish Shelar Criticize Uddhav Thackeray: पवार कुटुंबीय नातेसंबंध जपत असतील; एकमेकांना अडचणीच्या, सुखदुःखाच्या प्रसंगी भेटत असतील तर त्यात काही वावगं नाही. हे शोभनीय आहे. महाराष्ट्रातील सुसंस्कृतपणा दाखवणारं आहे. यातून थोडं उद्धव ठाकरे यांनी शिकलं पाहिजे
महाराष्ट्रात प्रगल्भ सांस्कृतिक परंपरा आहे. राजकारण एका बाजूला आणि पारिवारिक संबंध एका बाजूला असतात. पवार कुटुंबीय नातेसंबंध जपत असतील; एकमेकांना अडचणीच्या, सुखदुःखाच्या प्रसंगी भेटत असतील तर त्यात काही वावगं नाही. हे शोभनीय आहे. महाराष्ट्राला सुसंस्कृत दाखवणारं आहे. यातून थोडं उद्धव ठाकरे यांनी शिकलं पाहिजे, असा टोला मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज उद्धव ठाकरेंना लगावला.
आशिष शेलार म्हणाले की,'एक सही भविष्यासाठी' हा उपक्रम युवक विद्यार्थी आणि देशाच्या भविष्यासाठी आहे. ज्यांना कावीळ झाली आहे; त्यांना सगळे पिवळे दिसते. आदित्य ठाकरे यांना ती होऊ नये अशी माझी इच्छा आहे. आजकाल पावसानंतरचे आजार पसरत आहेत. राजकीय कावीळ त्यांना का झाली हा प्रश्न मी त्यांना नक्की विचारेल, असे आशिष शेलार शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना टोला लगावताना म्हणाले.
राजकारणाची चर्चा करून जे स्वतःचा स्पेस निर्माण करू पाहत आहेत त्या पक्षावर टीका टिप्पणी करणार नाही, अशी टीका आशिष शेलार यांनी यावेळी मनसेवर केली. त्यांचा विषय आंदोलन राजकीय आहे असेही ते म्हणाले.
आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थी विरोधी भूमिका महाराष्ट्रात घेतली आहे. त्यांचे सरकार असताना विद्यापीठाच्या विरोधातले निर्णय घेतले गेले. सर्व निर्णय कुलगुरूंच्या कुलपतींच्या दालनात न होता आदित्य ठाकरे यांच्या दालनात होत होते. विद्यापीठाच्या स्वायत्तेला बट्टा लावण्याचे काम आदित्य ठाकरे यांनी केले आहे. पदवीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी परीक्षाच देऊ नये असा तुघलकी निर्णय त्यांनी घेतला होता. विद्यार्थ्यांच्या माथी कोरोना पदवीधर असा शिक्का मारून संधीपासून विद्यार्थ्यांना परावृत्त करण्याचा निर्णय आदित्य ठाकरेंचा होता. विद्यापीठात थेट राजकीय नेमणुका करण्याचा कायद्यातील बद्दल हा आदित्य यांचा होता. त्यामुळे आदित्य ठाकरे इज इक्वल टू विद्यार्थ्यांच्या विकासाचा विरोध असेच म्हणावे लागेल. ते यावर बोलतील अशी आमची अपेक्षा नाही. किमान त्यांच्याकडे थोडे खासदार राहिले आहेत त्यांनी सभागृहात जेव्हा हे विधेयक येईल तेव्हा त्याच्या बाजूने बोलावे एवढे केले तरी खूप होईल, असाही टोला आशिष शेलार यांनी यावेळी लगावला.