आशिष शेलार यांचा शिवसेनेला इशारा; विरोधी विचारांच्या जीवावर अभद्र करणार नाही पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 02:05 PM2019-11-18T14:05:43+5:302019-11-18T14:06:30+5:30
मुंबईच्या महापौर पदाची निवडणूक आहे. या निवडणुकीत भाजपा उमेदवार उतरवणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं.
मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेच्या तिढ्यात भाजपा आणि शिवसेनेत तणाव निर्माण झाला. शिवसेनेने केंद्र सरकारमधून मंत्रिपदाचा राजीनामा देऊन एनडीएतून बाहेर पडली. मुख्यमंत्रिपदासाठी आक्रमक असणाऱ्या शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीनं राज्यात सरकार बनविण्याच्या हालचाली सुरु केल्या. मात्र त्याचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिसू लागला आहे.
मुंबईच्या महापौर पदाची निवडणूक आहे. या निवडणुकीत भाजपा उमेदवार उतरवणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. कारण शिवसेना ९३ तर भाजपा ८३ असं नगरसेवकांचे संख्याबळ महापालिकेत आहे. मुंबई महापालिका निवडणूक दोन्ही पक्षांनी स्वतंत्र्य लढल्या होत्या त्यामुळे राज्यातील सत्तास्थापनेत निर्माण झालेली कोंडी पाहता भाजपा या महापौर निवडणुकीत उमेदवार उतरविण्याची दाट शक्यता होती. अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद आणि सत्तावाटपाचा समान फॉर्म्युला ठरलाच नसल्याचा दावा भाजपाने केला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेने भाजपाची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सत्तास्थापनेसाठी बोलणी सुरू केली होती. त्याची परिणती शिवसेना आणि भाजपा यांच्यातील युती तुटण्यामध्ये झाली होती. मात्र भाजपा मुंबईचे माजी अध्यक्ष आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेत आम्ही आता तुल्यबळ आहोत, मात्र संख्याबळ नाही असं स्पष्ट केलं आहे.
मुंबई महापालिकेत आम्ही आता तुल्यबळ आहोत...मात्र संख्याबळ नाही. विरोधी विचारांच्या जीवावर आता अभद्र करणार नाही... मात्र 2022 चा मुंबईचा महापौर स्वबळावर.. आणि संख्याबळावरही! @Dev_Fadnavis@ChDadaPatil@MPLodha@manoj_kotak@BJP4Maharashtra@bjp4mumbai
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 18, 2019
मात्र विरोधी विचारांच्या जीवावर आता अभद्र करणार नाही मात्र २०२२ चा मुंबईचा महापौर स्वबळावर आणि संख्याबळावरही! असं विधान करत एकप्रकारे शिवसेनेला इशारा दिला आहे. २०२२ मध्ये मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा स्वतंत्र लढणार आणि महापौरपदासाठी ही लढत तीव्र होणार अशी चिन्ह भाजपा नेत्यांच्या वक्तव्यावरुन दिसून येत आहेत.
दरम्यान, मुंबई महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. सध्या मुंबई महानगरपालिकेत पहारेकऱ्याची भूमिका बजावत असलेल्या भाजपाने पालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत माहिती देताना भाजपा नेते आणि खासदार मनोज कोटक यांनी सांगितले की, ‘’महापौरपदाची निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक संख्याबळ आमच्याकडे नाही. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवार न देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. मात्र २०२२ मध्ये मुंबई महानगरपालिकेत भाजपाचाच महापौर विराजमान होईल, असा विश्वास कोटक यांनी व्यक्त केला.