Join us

मुंबई विद्यापीठातील ‘सामंत’शाहीमुळे नॅक मूल्यांकनावर परिणाम - आशिष शेलार यांचा गंभीर आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 4:05 AM

मुंबई : राज्यात ठाकरे सरकार आल्यापासून विद्यापीठांंच्या स्वायत्ततेवर घाला घालण्यात येत असून उच्च शिक्षणमंत्र्यांकडून विद्यापीठात ‘सामंतशाही’ सुरू आहे. सरकारने ...

मुंबई : राज्यात ठाकरे सरकार आल्यापासून विद्यापीठांंच्या स्वायत्ततेवर घाला घालण्यात येत असून उच्च शिक्षणमंत्र्यांकडून विद्यापीठात ‘सामंतशाही’ सुरू आहे. सरकारने मुंबई विद्यापीठात मनमानी पद्धतीने परस्पर कुलसचिवांची नियुक्ती केली आहे. सरकारच्या अहंकारामुळे विद्यापीठाच्या ‘नॅक’ मूल्यांकनावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी रविवारी केला आहे.

मुंबई विद्यापीठाची नॅक मूल्यांकनांची तयारी सुरू असतानाच सरकारने परस्पर नवीन कुलसचिवांची नियुक्ती केली. विद्यापीठ कायद्याप्रमाणे कुलगुरूंनी प्रभारी कुलसचिव नेमला असतानाही राज्य सरकारने विद्यापीठात पुन्हा ढवळाढवळ केली. कुलगुरूंनी १४ जानेवारी रोजी राज्य सरकारला पत्र लिहून नॅक मूल्यांकन असल्याने आता कुलसचिव बदलल्यास त्याचा मूल्यांकनावर परिणाम होईल, हे सांगितल्यावरही सरकारने विद्यापीठावर कुलसचिव थोपला. या बदलाचा नॅक मानांकनावर परिणाम झाल्यास राज्य सरकार जबाबदार राहील. विद्यापीठांचे सरकारी महामंडळ करण्याच्या दिशेने वाटचाल चालली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये सरकारी हस्तक्षेप नको असेच म्हटले आहे. मात्र अहंकारी ठाकरे सरकारने मनमानी सुरूच ठेवली आहे. हा विद्यापीठाच्या स्वायत्ततेवर घाला आहे, असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.