Join us

केंद्रीय यंत्रणांच्या नावाने राज्यात वसुलीचं षडयंत्र, आशिष शेलारांचा धक्कादायक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 1:33 PM

राज्यातील प्रशासकीय यंत्रणा अशा प्रकारे केंद्रीय यंत्रणांच्या नावाचा वापर करुन वसूली तर करीत नाही ना? असा सवाल आशिष शेलारांनी उपस्थित केला.

मुंबई – राज्यात मागील काही दिवसांपासून केंद्रीय तपाय यंत्रणांच्या मोठ्या प्रमाणात कारवाई होत असल्याचं पाहायला मिळत आहे. ईडी, आयकर विभाग, सीबीआय या तपास यंत्रणा राज्यात सक्रीय झाल्या आहेत. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सुरू आहे. तर आता भाजपा आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत केंद्रीय यंत्रणांच्या नावाखाली राज्यात प्रशासकीय यंत्रणा वसुलीचं षडयंत्र रचत असल्याचा धक्कादायक आरोप विधानसभेत केला आहे.

आशिष शेलार(BJP Ashish Shelar) विधानसभेत म्हणाले की, केंद्रीय यंत्रणांच्या नावाने वसूलीचे षडयंत्र राज्यातील प्रशासकीय यंत्रणेत रचले जात तर नाही ना? अशी शंका सौरभ त्रिपाठी यांचे प्रकरण उघड झाल्यामुळे  उपस्थित होते आहे. त्यामुळे या प्रकरणी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. शेलारांची ही मागणी मान्य करत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील(Dilip Walse Patil) यांनीही चौकशीची घोषणा केली आहे.

राज्याच्या पोलीस दलातील सौरभ त्रिपाठी हे आयपीएस अधिकारी आंगडीया या व्यापाऱ्यांकडून आयकर अधिकारी असल्याचे भासवून वसूली करीत असल्याचे उघड झालं. त्यानंतर राज्य शासनाने सौरभ त्रिपाठी यांना निलबित केले. या कारवाईचे स्वागत करत शेलारांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. या प्रकरणानंतर राज्यातील प्रशासकीय यंत्रणा अशा प्रकारे केंद्रीय यंत्रणांच्या नावाचा वापर करुन वसूली तर करीत नाही ना? केंद्रीय यंत्रणांना बदनाम करण्याचे षडयंत्र तर राज्यातील प्रशसकीय यंत्रणेमध्ये शिजत तर नाही ना? त्रिपाठीसारखे अन्य कोणी अधिकारी वसूली तर करीत नाही ना? अशी शंका उपस्थित केली.

तसेच त्यांच्या पाठीशी कोण उभे आहे की काय? असे प्रश्न आता उपस्थित होत असून असे असेल तर महाराष्ट्राची  आणि देशाची बदनामी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही गंभीर बाब असून याप्रकरणी तातडीने शासनाने दखल देऊन आवश्यकता असल्यास चौकशी करावी, अशी मागणी आमदार ॲड आशिष शेलार यांनी केली. त्यावर उत्तर देताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याची शासन दखल घेत असून चौकशी केली जाईल अशी घोषणा केली.

टॅग्स :आशीष शेलारदिलीप वळसे पाटीलअर्थसंकल्पीय अधिवेशन