Join us

मराठा समाजात गरिब-श्रीमंत असा भेद करु नये, अशोक चव्हाणांचा आंबेडकरांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 9:00 PM

प्रकाश आंबेडकर हे एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात बोलत होते. मराठा आरक्षणासंदर्भात प्रश्न विचारला असता, ‘180 ते 182 आमदारांना आरक्षण नकोय. मी श्रीमंत मराठाविरुद्ध गरीब मराठा, असे विधानही केले होते.

ठळक मुद्देप्रकाश आबंडेकरांच्या या वक्तव्याला विरोध करत, त्यांनी मराठा समाजात फूट पाडू नये, असे अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. नांदेड येथील मराठा समाजाच्या आंदोलकांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी आंबेडकराना सल्ला दिला.

मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. यामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे. यासंदर्भात आघाडी सरकारविरोधात सकल मराठा समाजाने संताप व्यक्त करत, वेळप्रसंगी कोरोनाचे संकट झुगारून रस्त्यावर उतरू, असा इशारा दिला आहे. याच मुद्द्यावर बोलताना "जोवर श्रीमंत मराठ्यांच्या हातात सत्ता आहे, तोवर गरीब मराठ्यांना सत्ता आणि आरक्षणदेखील मिळणार नाही," असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते. आंबेडकरांच्या हे विधान चुकीचं असल्याचं कॅबिनेटमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलंय.   

प्रकाश आंबेडकर हे एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात बोलत होते. मराठा आरक्षणासंदर्भात प्रश्न विचारला असता, ‘180 ते 182 आमदारांना आरक्षण नकोय. मी श्रीमंत मराठाविरुद्ध गरीब मराठा, असे विधानही केले होते. त्यामुळे श्रीमंत मराठ्यांच्या हातात सत्ता आहे, तोपर्यंत गरीब मराठ्यांना सत्ता आणि आरक्षणही मिळणार नाही. त्यामुळे गरीब मराठ्यांनी आपली भूमिका घेणे आवश्यक आहे. आपल्या जातीबरोबर राहायचे की आरक्षणाबरोबर राहायचे हे त्यांनी ठरवणे आवश्यक आहे,” असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

प्रकाश आबंडेकरांच्या या वक्तव्याला विरोध करत, त्यांनी मराठा समाजात फूट पाडू नये, असे अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. नांदेड येथील मराठा समाजाच्या आंदोलकांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी आंबेडकराना सल्ला दिला. ''बाळासाहेब आंबेडकर यांनी मराठा समाजाची आरक्षणाच्या मुद्द्यावरुन केलेली विभागणी चुकीची आहे. सरसकट मराठा समाज हा एकमेकांच्या पाठिशी आहे. समाजात श्रीमंत व गरिब असा भेद होत नसतो, आंबेडकर यांनी तसा प्रयत्न करु नये, असे चव्हाण यांनी म्हटलंय. मराठा आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडीचे सरकार सकारात्मक असून न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडणार असल्याचेही चव्हाण त्यांनी स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अनेक विधीतज्ज्ञांशी चर्चा सुरू असून मुख्यमंत्री सर्वच बाबी तपासून पाहत आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार मराठा समाजासोबत आहे. त्यामुळे, मराठा समाजाने आंदोलन करण्याची गरज नाही. रस्त्यावर लढाई लढून उपयोग नाही, न्यायालयीन लढाई न्यायालयातच लढावी लागेल, असेही चव्हाण यांनी स्पष्टपणे सांगितले.  

टॅग्स :प्रकाश आंबेडकरअशोक चव्हाणमराठामराठा आरक्षण