मुंबई/नांदेड - लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळेच, गेल्या काही दिवसांपासून उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेकडे मराठा समाजाचे आणि राजकीय नेत्यांचे लक्ष लागले होते. राज्यातील प्रत्येक मतदारसंघात मराठा समाजाचा उमेदवार देण्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली होती. मात्र, मराठा समाजासोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी भूमिका बदलली असून सगेसोयरेला विरोध करणाऱ्या उमेदवारांना पाडा, असे म्हणत जरांगे यांनी भूमिका स्पष्ट केली. त्याच, पार्श्वभूमीवर मराठा समाज गावागावात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. नुकतेच भाजपात गेलेल्या खासदार अशोक चव्हाण यांना मराठा समाज बांधवांच्या रोषाचा सामना करावा लागला.
लोकसभा निवडणुकांपूर्वी राज्यात मराठा आरक्षणासाठी मोठं आंदोलन पुकारण्यात आलं होतं. मराठा समाज बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत मराठा आरक्षणासाठी सरकारला धारेवर धरलं. त्यानंतर, सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र १३ टक्के आरक्षणही दिलं आहे. मात्र, ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत. त्यामुळेच, आगामी निवडणुकांत त्यांच्या आणि मराठा समाजाच्या रोषाचा सामना उमेदवारांना करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी सोलापूरमध्ये आमदार प्रणिती शिंदेंना मराठा समाज बांधवांनी जाब विचारला होता. त्यानंतर, आता अशोक चव्हाण यांची गाडी गावात येताच मराठा समाज बांधव आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथे खासदार अशोक चव्हाण भाजपाच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी, मराठा समाज बांधांनी अशोक चव्हाण यांच्या गाडीला घेराव घातला. तसेच, एक मराठा-लाख मराठा अशी घोषणाबाजी करत अशोक चव्हाण यांना गावातून परत जाण्यासाठी भाग पाडले. पोलिसांच्या मध्यस्तीने मराठा बांधवांच्या गराड्यातून चव्हाण यांची गाडी बाहेर काढण्यात आली. त्यानंतरही, मराठा बांधवांकडून मराठा आरक्षणासंदर्भाने नारेबाजी सुरूच होती. भाग गया रे, भाग गया अशोक चव्हाण भाग गया... अशीही घोषणाबाजी काही मराठा बांधवांनी यावेळी केली.
दरम्यान, नांदेडचे लोकसभा उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उमेदवारासाठी अशोक चव्हाण गावात आले होते. त्यावेळी, मराठा समाज बांधवांनी तीव्र संताप व्यक्त करत खासदार चव्हाण यांना गावातून परत फिरण्यास भाग पाडले.