मुंबई - भाजपाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यकर्ते मनोज दुबे यांची निर्घृण हत्या केली आहे. काँग्रेस पक्ष भाजपाच्या गुंडानी केलेल्या या भ्याड कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध करत असून ही काँग्रेस कार्यकर्त्यांची नाही तर लोकशाहीची हत्या आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. काँग्रेस कार्यकर्ते मनोज दुबे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून काँग्रेस पक्ष दुबे कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले. पुढे ते असंही म्हणाले की, ''आपल्या देशात लोकशाही असून विचारांचा सामना विचारांनी करण्याची आपली परंपरा आहे. पण राजकीय विरोधक हे आपले शत्रू असून त्यांना संपवण्याची नवीन प्रथा भारतीय जनता पक्षाने आणली आहे. आपल्या विरोधकांना संपवण्यासाठीच गुंडाना आपल्या पक्षात घेऊन भाजपा त्यांना संरक्षण देत आहे. मनोज दुबे यांनी २०१९ साली देशात व राज्यात काँग्रेसचे सरकार येईल, अशी पोस्ट फेसबुकवर टाकली होती. त्यामुळे चिडून भाजपाच्या कार्यकर्त्यांनी दुबे यांची निर्घृण हत्या केली हे लोकशाहीसाठी दुर्देवी आहे.
राजकीय फायद्यासाठी जाती जातीत, धर्मा धर्मात भांडणे लावून सामाजिक वातावरण कलुषीत करण्याचा उद्योग भारतीय जनता पक्ष सुरुवातीपासूनच करत आहे. समाजात द्वेष पसरवून राष्ट्रीय एकात्मता व देशाला कमजोर करण्याचे काम भाजप नेत्यांकडून सुरु होते. भाजपचे कार्यकर्ते ही या कामात सहभागी आहेत हे या घटनेवरून सिद्ध झाले आहे. मनोज दुबे यांच्या मारेक-यांना व त्यांच्या मागील सूत्रधारांना पोलिसांनी तात्काळ अटक करावी व त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली.