भाजपाच्या मुखात छत्रपती शिवाजी महाराज आणि ह्रदयात छिंदम - खा. अशोक चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2018 06:39 PM2018-04-06T18:39:14+5:302018-04-06T18:39:14+5:30
गोळवलकरांच्या विचारधनातून आलेला संघाचा मनुवाद जोपर्यंत मनातून जात नाही, तोपर्यंत भारतीय जनता पक्ष हा जातीयवादी पक्ष म्हणूनच ओळखला जाईल. मुखात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आणि ह्रदयात छिंदम हा भाजपचा दुटप्पी चेहरा जनता ओळखून आहे.
मुंबई- गोळवलकरांच्या विचारधनातून आलेला संघाचा मनुवाद जोपर्यंत मनातून जात नाही, तोपर्यंत भारतीय जनता पक्ष हा जातीयवादी पक्ष म्हणूनच ओळखला जाईल. मुखात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आणि ह्रदयात छिंदम हा भाजपचा दुटप्पी चेहरा जनता ओळखून आहे. आरक्षण हटवू देणार नाही, असे कितीही म्हटले तरी मोहन भागवतांनी संघ आणि भाजपाचे आरक्षण विरोधी मत अगोदरच प्रदर्शित केलेले आहे. राहुल गांधींना चार पिढयांचा हिशोब मागणा-या भाजपाध्यक्षांना उत्तर देताना खा. चव्हाण म्हणाले की, राहुल गांधीजींच्या परिवारातील पंडित नेहरूंनी देशासाठी १० वर्ष तुरुंगवास भोगला. इंदिरा गांधी व राजीव गांधी यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. संघ परिवारातील एकातरी नेत्याची करंगळी तरी देशासाठी कापली गेली का? असा प्रश्न विचारून काँग्रेस व गांधी परिवाराने देशासाठी त्याग करून पायाभरणी केली. त्यातूनच एक तथाकथित चहा विकणारा देशाचा पंतप्रधान होऊ शकला. परंतु भाजपने घोटाळा करण्यासाठी तो चहा ही सोडला नाही असा टोला खा. चव्हाण यांनी लगावला.
देशात आणि राज्यात सामाजिक एकता, अखंडता धोक्यात आणणा-या अर्थव्यवस्था, बेरोजगारी, कृषी, परराष्ट्र नीती, अंतर्गत सुरक्षा या सर्व आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरलेल्या भाजपाचा स्थापना दिवस सोहळा म्हणजे नापास झालेल्यांनी आनंद साजरा करण्याचाच प्रकार आहे. खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भाजपची जुमलेबाजी जनता आता स्वीकारणार नसून 2019साली भाजपाची हकालपट्टी निश्चित आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे. राज्याच्या मंत्रिमंडळातील 21 मंत्र्यांवर गंभीर घोटाळ्याचे आरोप आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील घोटाळेबाज मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले भाजप अध्यक्ष अमित शहा भ्रष्टाचाराच्या डोंगरावर उभे राहून पारदर्शकतेच्या वल्गना करीत आहेत हे हास्यास्पद आहे.
याबाबत बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, राज्यात भाजपाचे सरकार आल्यापासून 13 हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. मंत्रालयाला आत्महत्यालय करणारे शेकडो कोटींची उधळपट्टी करून स्थापना दिवसाचा उत्सव साजरा करित आहेत. हा कसला उत्सव आहे? 13 हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्या त्या शेतक-यांच्या मरणाचा उत्सव का? असा सवाल करून या उत्सवासाठी खर्च झालेले कोट्यवधी रुपये कुठून आले?नीरव मोदींकडून की विजय माल्याकडून ? अशी विचारणा खा. चव्हाण यांनी केली.
या सोहळ्यानिमित्त भाजप नेत्यांमध्ये खोटे बोलण्याची स्पर्धाच लागली होती. मुख्यमंत्र्यांना आपण चार वर्षात काय केले हे आपल्या भाषणात सांगता आले नाही. भाजपाध्यक्षांनी आपल्या जुमलेबाज व्यक्तिमत्त्वाला साजेसे महाराष्ट्रात आत्महत्या कमी झाल्या आहेत. गुंतवणूक वाढली आहे. भ्रष्टाचार कमी झाला आहे अशा हास्यास्पद कोट्या केल्या व 2019साठी काही नवीन जुमले सोडले. शेतक-यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचे आश्वासन सत्तेवर येऊन चार वर्ष झाल्यानंतर भाजपला आठवले आहे. भाजपच्या खोटारडेपणाचा जनतेला उबग आला असून पैसे खर्च करून, खोटी अमिषे दाखवून जमा केलेल्या गर्दीचा अनुत्साह आणि थंडा प्रतिसाद पाहता 2019मध्ये भाजपची हकालपट्टी निश्चित आहे हे आता भाजपाच्या कार्यकर्त्यांनाही समजले आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.