मुंबई/नांदेड - आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे महाराष्ट्रातील दौरे वाढले आहे. त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे दोन्ही दिग्गज नेते सोमवारी एकाच दिवशी राज्यात येणार आहेत. त्यानुसार, पंतप्रधान मोदी सोमवारी नांदेडमार्गे तेलंगणातील अदिलाबादच्या सभेला जाणार आहे. दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मंगळवारी छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव येथे सभा होणार आहे. मोदींच्या या दौऱ्यात नांदेड विमानतळावर माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी पतंप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सकाळी नागपूर विमानतळावर आगमन झाले होते. यावेळी, नितीन गडकरी त्यांच्या स्वागताला हजर होते. पाचच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याला भेट दिली होती. तेथे जाण्यासाठी ते प्रथम नागपूला आले होते व आज पुन्हा नागपूर विमानतळावर सकाळी मोदींचे आगमन झाले. येथून ते तेलंगणाला गेले. या दोन्ही वेळा त्यांच्या स्वागताला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. तर, तेलंगणातून परतीच्या प्रवासावेळी मोदी नांदेड विमानतळावर आले असता, खासदार अशोक चव्हाण यांनी मोदींची भेट घेतली.
माजी मुख्यमंत्री राहिलेल्या अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचा हात सोडून भाजपाचे कमळ हाती घेतले. अशोक चव्हाण काँग्रेस सोडून गेल्याने मराठावाड्यात, विशेषत: नांदेड जिल्ह्यात काँग्रेसला धक्का बसला आहे. तर, भाजपाची ताकदही वाढली आहे. अशोक चव्हाण यांचा प्रवेश घाईघाईत झाला, त्यामुळे, भाजपच्या कुठल्याही बड्या नेत्याशिवाय किंवा केंद्रीय नेतृत्त्वाशिवाय त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे, अशोक चव्हाण यांना भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना भेटण्याची घाई आहे. त्यातच, आज नरेंद्र मोदी नांदेडमार्गे चेन्नईला जात असताना विमानतळावर अशोक चव्हाण यांनी मोदींची भेट घेऊन खासदारीबद्दल आभार मानले.
''देशाचे लोकप्रिय व यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज आदिलाबादहून नांदेडमार्गे चेन्नईला रवाना होण्यासाठी नांदेड विमानतळावर आगमन झाले असता त्यांचे स्वागत केले. त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाने मला राज्यसभेची संधी दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानले,'' असे ट्विट अशोक चव्हाण यांनी केले आहे.
दरम्यान, अशोक चव्हाण यांच्या पक्षांतरामुळे काँग्रेसमधील अनेक नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर, ज्या अशोक चव्हाणांवर भाजपाने आदर्श घोटाळ्यावरुन आरोप केले. ज्या पंतप्रधानांनी आदर्श घोटाळ्याचा उल्लेख करत काँग्रेसला लक्ष्य केले होते. त्याच, भाजपात आल्यानंतर पंतप्रधान मोदींनीही आज अशोक चव्हाण यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळाच चर्चा होत आहे. दरम्यान, आदर्श घोटाळा प्रकरणात उच्च न्यायालयात आमच्या बाजुने निकाल लागला असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे.