Join us  

अशोक चव्हाणांकडून उद्धव ठाकरेंचा लाडके मुख्यमंत्री उल्लेख; कोरोना काळात केलेल्या कामाचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2023 6:25 PM

'तेव्हाचे राजकारण टेस्ट क्रिकेट, आजचं राजकारण आयपीएल.'

मुंबई- ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि लोकमत समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा(बाबुजी) यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या 'जवाहर' या चरित्र ग्रंथाचे मुंबईत प्रकाशन झाले. यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, उद्धव ठाकरे, राजेंद्र दर्डा, विजय दर्डा, प्रल्हाद पै यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी अशोक चव्हाणांनी आपले मनोगत व्यक्त करताना बाबुजींच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी चव्हाणांनी उद्ध ठाकरेंचा लाडका मुख्यमंत्री असा उल्लेख केला. 

अशोक चव्हाण म्हणाले, विजयबाबुंच्या भाषणात बाबुजींचा सर्व कार्यकाळ डोळ्यासमोर आला. 1992 मध्ये बाबुजींची विधानसभेची चौथी टर्म होती आणि मी विधानपरिषदेत गेलो होतो. शरद पवारांच्या मंत्रिमंडळात ते उद्योगमंत्री, उर्जामंत्री, परिवहन मंत्री म्हणून काम पाहिले. बाबुजींनी आखलेल्या धोरणांमुळे महाराष्ट्र खुप पुढे गेला. 

वसंतराव नाईक आणि शंकरराव चव्हाण यांच्यासोबत बाबुजींचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. बाबुजींनी अनेक मुख्यमंत्र्यांसोबत कामे केली, त्या सर्वांचा बाबुजींवर खूप विश्वास होता आणि त्यांनीही कधीच विश्वासाला तडा जाऊ दिला नाही. त्या काळापासून आजपर्यंत राजकीय प्रवास बदलत गेला, राजकारण बदलत गेले. आज राजकारणाची तुलना केली तर तेव्हाचे राजकारण टेस्ट क्रिकेट आणि आजचे राजकारण आयपीएलसारखे आहे. ते पुढे म्हणाले, आता राज्यातील जनताच ठरवेल काय चांगलं अन् काय वाईट. एक मंत्री म्हणून टीम म्हणून आम्ही सगळ्यांनी चांगली कामे केली आहेत. उद्धव ठाकरेंशी आमचे जास्त संबंध आले नव्हते. त्यांचा पक्ष वेगळा, त्यांची कार्यपद्धती, विचारसरणी वेगळी होती. पण, आमच्या दोन-अडीच वर्षांमध्ये आम्ही त्यांची कामे पाहिली. कोरोनाच्या काळात त्यांनी जे चांगले काम उद्धव ठाकरेंनी केले, त्याला तोड नाही. 

आम्ही एकत्र कसे येऊ, हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. आमचे नेतृत्व म्हणाले, तुम्ही एकत्र कसे येणार. त्यांना आम्ही म्हणालो, आम्ही चांगले काम करुन दाखवू. कोरोना काळात महाराष्ट्राने केलेले काम संपूर्ण जगाने पाहिले आहे. चांगली कामे व्हावीत, असा आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहिला आहे. निर्णय घेत असताना महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे, हाच आमचा उद्देश असतो. शेवटी, आजच्या काळात वृत्तपत्राची क्रेडिबिलीटी सांभाळायची असेल, तर जे घडलंय ते छापलं पाहिजे आणि लोकमतने हेच काम करत आहे, अशी मत अशोक चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले.

टॅग्स :उद्धव ठाकरेअशोक चव्हाणलोकमतशिवसेनाकाँग्रेस