मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या साडेचार वर्षांपासून सुरू असलेल्या उलथापालथी आणि फोडाफोडीच्या मालिकांचा नवा अध्याय पुन्हा पाहायला मिळत आहे. काँग्रेसमध्ये भूकंप घडवणारी माहिती समोर आली असून, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे राज्यातील ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याचे पत्र आता समोर आले असून त्यांनी आमदारकीचाही राजीनामा दिल्याचे दिसून येते.
गेल्या दीड वर्षांत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असली तरी काँग्रेस मात्र एकसंध होता. मात्र, काँग्रेसमधील वरिष्ठ नेते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वावर नाराज होते. त्यातूनच, अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा आणि आमदाराकीचा राजीनामा दिल्याचे समजते. मात्र, चव्हाण यांच्या या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात भूकंप घडल्याची चर्चा सुरू आहे. अशोक चव्हाण यांनी आपले राजीनामा पत्र नाना पटोले यांच्याकडे दिले आहे. त्यामध्ये, स्वत:चा उल्लेख करताना माजी विधानसभा सदस्य असे म्हटले आहे. त्यामुळे, त्यांनी आमदाराकीचाही राजीनामा दिल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे आज सकाळीच त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतल्याचे वृत्त माध्यमांत झळकले होते.
अशोक चव्हाण यांनी दिलेल्या राजीनामापत्रात, मी १२ फेब्रुवारी २०२३ दुपारपासून इंडियन नॅशन काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा सादर करत आहे, असे चव्हाण यांनी म्हटले आहे. दरम्यान, अशोक चव्हाण यांच्यासोबत २ ते ३ काँग्रेस आमदारही राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे समजते. तसेच, लवकरच अशोक चव्हाण भाजपात प्रवेश करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात या राजीनाम्यानंतर रंगली आहे. मात्र, भाजप नेतृत्वाने यावर भूमिका मांडताना आगे आगे देखिये, होता है क्या... असे म्हटले आहे.