Join us  

काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर; थोरातांविरोधात अशोक चव्हाणांनी लिहिलं थेट सोनिया गांधींना पत्र?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 9:08 PM

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्लीच्या हायकमांड सोनिया गांधी यांना पत्र पाठवलं आहे.

मुंबई - दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आले असताना महाराष्ट्रतही असाच प्रकार समोर येत आहे. अलीकडेच महाराष्ट्रात काँग्रेस शिवसेना-राष्ट्रवादीसोबत सरकारमध्ये सहभागी झाली आहे. मात्र अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील अंतर्गत कलह समोर आला आहे. 

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्लीच्या हायकमांड सोनिया गांधी यांना पत्र पाठवलं आहे. याबाबत एबीपी न्यूज या हिंदी वृत्तवाहिनीने बातमी दिली आहे. या पत्रात अशोक चव्हाणांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाची समाधानकारक कामगिरी न केल्याचा ठपका बाळासाहेब थोरात यांच्यावर ठेवला आहे. त्यामुळे पक्षाच्या या परिस्थितीला थोरात जबाबदार असून त्यांना पदावरून हटवावं आणि त्यांच्या जागी मला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. 

विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी राज्यात चांगली झाली नाही. स्वत: तत्कालीन प्रदेशाध्यक्ष असलेले अशोक चव्हाण यांना आपली नांदेडची जागा राखता आली नाही. संपूर्ण राज्यात केवळ एकाच जागी काँग्रेसचा विजय झाला. त्यामुळे अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला होता. हा राजीनामा केंद्रीय नेतृत्वाने स्वीकारुन बाळासाहेब थोरात यांच्यावर जबाबदारी टाकली होती. 

वृत्तानुसार, अशोक चव्हाण यांना पुन्हा काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी हवी आहे. त्यासाठी त्यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं आहे. लवकरच महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची निवड करण्यात येणार आहे. यामध्ये अशोक चव्हाणांसोबत माजी खासदार राजीव सातव यांचेही नाव आहे. त्यामुळे सोनिया गांधी या कलहावर काय निर्णय घेतात हे आगामी काळात कळेलचं. 

मात्र, अशोक चव्हाण यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिल्याचा दावा फेटाळून लावला आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना मी एक पत्र लिहिल्यासंदर्भातील बातमी धादांत खोटी, खोडसाळ आणि जाणीवपूर्वक बदनामी करणारी आहे. मी असे कोणतेही पत्र लिहिलेले नाही असं त्यांनी सांगितले आहे. 

दरम्यान, मागील काही दिवसांपासून अशोक चव्हाण यांच्या विधानामुळे अनेकदा वादंग निर्माण झाले आहेत. यामध्ये मुस्लिमांच्या आग्रहाखातरच काँग्रेस सत्तेत सहभागी झाली त्याचसोबत शिवसेनेसोबत सत्तेत जाण्यासाठी पहिल्यांदा उद्धव ठाकरेंकडून लिहून घेतलं होतं या विधानांनी अशोक चव्हाण चर्चेत आले होते. त्याचसोबत चांगल्या मंत्रिपदासाठीही त्यांनी आग्रही भूमिका घेतली होती. त्यामुळे अजित पवारांसोबत बैठकीदरम्यान त्यांचे खटके उडाल्याची माहिती समोर आली होती. त्यावेळी सुरुवातीच्या महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेच्या निर्णय प्रक्रियेत पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आघाडीवर होते.  

 

टॅग्स :काँग्रेसअशोक चव्हाणसोनिया गांधीबाळासाहेब थोरात