Join us

अशोक चव्हाणांचा भाजपा प्रवेश, खडसेंचं तत्काळ ट्विट; कार्यकर्त्यांना केलंय आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 2:46 PM

भाजपाचे वरिष्ठ नेते राहिलेल्या एकनाथ खडसेंनी भाजपची साथ सोडून देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

मुंबई - काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपात प्रवेश केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार होता. परंतु, त्यापूर्वीच आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश करण्यात आला. अशोक चव्हाण यांच्यासह माजी आमदार राजूरकर यांनीही भाजपात प्रवेश केला. दरम्यान, अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशानंतर आमदार एकनाथ खडसेंचाही भाजपात प्रवेश होणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यावर, आता स्वत: एकनाथ खडसेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. 

भाजपाचे वरिष्ठ नेते राहिलेल्या एकनाथ खडसेंनी भाजपची साथ सोडून देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेसचेही दोन पक्ष झाले असून मूळ पक्ष अजित पवारांचा असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले. त्यामुळे, एकनाथ खडसे हे शरद पवारांसोबत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अशी फूट पडल्याने अनेक नेते संभ्रमात आहेत. त्यातच, अशोक चव्हाण यांचा भाजपा प्रवेश होत असल्याने आमदार एकनाथ खडसे हेही भाजपात प्रवेश करतील, अशी चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यावर, आता स्वत: नाथाभाऊंनी ट्विट करुन स्पष्टीकरण दिलं आहे. 

''गेले काही दिवसापासून मी भाजपा मध्ये प्रवेश करणार, अशा अफवा माझ्याबद्दल संभ्रम निर्माण व्हावा, या हेतूने पसरविल्या जात आहेत. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात आहे व राहणार. कार्यकर्त्यांनी, आणि नागरिकांनी अशा अफवांकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहनही एकनाथ खडसे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. दरम्यान, भाजपा नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनीही एकनाथ खडसे भाजपात येण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं म्हटलं होतं. आता, खडसेंनीच स्पष्टीकरण दिलं आहे.

भाजपा प्रवेशानंतर काय म्हणाले फडणवीस

अशोक चव्हाणांना राज्यसभेचे उमेदवार बनविणार का, या प्रश्नावर फडणवीस यांनी थेट उत्तर देणे टाळले. भाजपाचे केंद्रीय नेते राज्यसभेचे उमेदवार ठरवितात. येत्या काही दिवसांत त्यांची यादी येईल तेव्हा तुम्हाला समजेल असे फडणवीस म्हणाले. अशोक चव्हाण यांना प्रशासकीय आणि राजकीय अनुभव आहे. त्याचा आम्हाला फायदा होईल असे, फडणवीस म्हणाले. अशोक चव्हाण यांचा भाजपातील भुमिका काय असेल हे केंद्रीय भाजपा ठरवेल. त्यांची जी प्रतिमा आहे ती राष्ट्रीय स्तरावरील आहे. यामुळे केंद्रात निर्णय घेतला जाईल, असे फडणवीस म्हणाले. एवढ्या वर्षांची पुण्याई सोडून हे लोक आमच्यासोबत का येतायत, कारण काँग्रेसला घर सांभाळता येत नाहीय. भाजपाला विरोध करता करता ते आता देशाच्या विकासाला विरोध करू लागले आहेत. यामुळे त्यांना नेते का सांभाळता येत नाहीत याचे आत्मचिंतन करावे, असे फडणवीस म्हणाले.  

टॅग्स :एकनाथ खडसेभाजपाशिवसेनाअशोक चव्हाणकाँग्रेस