अशोक मामांना आज 'महाराष्ट्र भूषण'; 'या' दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 07:50 AM2024-02-22T07:50:47+5:302024-02-22T08:00:38+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन अशोक सराफ यांचे अभिनंदन करत त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला
मुंबई - विनोदी, खलनायकाच्या भूमिकेतून कसलेला मराठमोळा अभिनेता अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. आज दिग्गजांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. सिनेमा असो, नाटक किंवा छोट्या पडद्यावरची मालिका... भूमिका तुफान विनोदी असो, नर्म विनोदी असो किंवा धीरगंभीर... ज्यांनी आपल्या परिसस्पर्शानं शेकडो भूमिकांचं सोनं केलं, मराठी रसिकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलं आणि मराठी सिने-नाट्यसृष्टीला वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी अत्यंत प्रामाणिक प्रयत्न केले, असे अभिनयातील वजीर ज्येष्ठ अभिनेते म्हणजे अशोक सराफ. त्यांच्या सिनेसृष्टीतील त्यांच्या अविरत, अखंडीत कार्याची दखल घेऊन त्यांचा आज महासन्मान होत आहे.
मुख्यमंत्रीएकनाथ शिंदें यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन अशोक सराफ यांचे अभिनंदन करत त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला. 'कला क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं. मुख्यमंत्र्यांच्या ट्विटनंतर मनोरंजन सृष्टीतील कलाकार आणि चाहत्यांकडून अशोक सराफ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राज्य सरकारकडून दिला जाणारा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून आज त्यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव होत आहे. वरळी डोम, एनएससीआय येथे सायंकाळी ६.०० वाजता होणाऱ्या ५७ व्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्याहस्ते अशोक मामांचा गौरव होईल.
अशोक सराफ यांच्या सन्मान सोहळ्यासाठी केंद्रीयमंत्री पियुष गोयल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रमुख अतिथी असणार आहेत. यासह सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारही उपस्थित असणार आहेत.
अशी ही बनवाबनवी सारख्या अजरामर चित्रपटातील विनोदी भूमिका असेल, किंवा दगा, पंढरीची वारी या चित्रपटात साकारलेला व्हिलन असेल, आपल्या कसदार अभिनयाची साक्ष अशोक मामांनी महाराष्ट्रावर सोडली आहे. तर, हिंदी सिनेसृष्टीतीलही करण-अर्जून, सिंघम यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटातील त्यांची छोटी पण अविस्मरणीय अशी भूमिका आजही प्रक्षेकांच्या, चाहत्यांच्या मनात घर करुन आहे. दरम्यान, अशोक सराफ यांनी ५० हिंदी आणि एका भोजपुरी चित्रपटात काम केले.
पुरस्कार जाहीर होताच काय म्हणाले अशोक मामा?
"मला एवढ्या लवकर महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळेल असं वाटलं नव्हतं. किंवा, मला माझं काम तेवढंही वाटत नव्हतं. मला महाराष्ट्र भूषण दिग्गजांच्या पंक्तीला नेऊन बसवलंय त्यामुळे मी नि:शब्द झालोय. कारण, ज्यांना पुरस्कार मिळाला ते थोर लोकं आहेत. त्यामुळे मी काहीतरी केलं आहे याची जाणीव मला व्हायला लागली आहे. तुम्ही ती मला करुन दिली हे मी कधीच विसरणार नाही", अशा शब्दात अशोक सराफ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. पुढे ते म्हणतात, "मी अतिशय भारावून गेलो आहे. या सगळ्यामुळे मला आणखी काहीतरी चांगलं आणि वेगळं करायचंय या जाणीवेने मी आता बांधलो गेलो आहे. मी सिलेक्टेड काम करतोय. पण, निश्चितच मी काम करत राहणार. तुम्ही माझे आहात आणि मी तुमचा आहे. मी तुमच्याशिवाय राहूच शकत नाही. त्यामुळे काम करायलाच पाहिजे.", असेही त्यांनी म्हटले होते.