अशोकस्तंभ उद्यानात उभारा
By admin | Published: April 16, 2015 12:34 AM2015-04-16T00:34:41+5:302015-04-16T00:34:41+5:30
चेंबूरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोर ९ वर्षांपूर्वी पालिकेने अशोकस्तंभ उभारला. मात्र त्याला केंद्राची परवानगी नसल्याने अद्यापही हा स्तंभ अर्धवट स्थितीमध्ये आहे.
रहिवाशांची मागणी : नऊ वर्षांपासून अर्धवट स्थितीत
मुंबई : चेंबूरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोर ९ वर्षांपूर्वी पालिकेने अशोकस्तंभ उभारला. मात्र त्याला केंद्राची परवानगी नसल्याने अद्यापही हा स्तंभ अर्धवट स्थितीमध्ये आहे. त्यामुळे पालिकेने हा अशोकस्तंभ उद्यानाच्या आवारात उभारावा, अशी मागणी परिसरातील रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
२००५मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीने चेंबूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे सुशोभीकरण व त्यासमोर अशोकस्तंभ उभारण्यास मंजुरी दिली. त्यानुसार पालिकेने तब्बल २ कोटींचा निधी खर्च करून उद्यानाचे सुशोभीकरण केले. या उद्यानासमोर अशोकस्तंभ देखील उभारला. अशोकस्तंभ ही राष्ट्रीय राजमुद्रा असल्याने तिचा वापर केवळ राजभवन, राजनिवास, राज्य विधिमंडळ, उच्च न्यायालये आणि राज्यातील अथवा केंद्रशासित प्रदेशातील सचिवालयीन, शासकीय इमारतींसाठी केला जातो. त्यामुळे त्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाची परवानगी घेणे आवश्यक असते. महापालिकेने अशी कोणतीही परवानगी न घेता डॉ. आंबेडकर उद्यानाचे सुशोभीकरण करून समोर अशोकस्तंभाच्या बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात केली. काम सुरू असतानाच केंद्रीय गृह मंत्रालयाने यास आक्षेप घेतला. परिणामी, पालिकेला या अशोकस्तंभाचे काम अर्धवटच ठेवावे लागले.
गेल्या नऊ वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोर अशोकस्तंभ अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे पालिकेने उद्यानाच्या आवारात अशोकस्तंभ उभारावा, अशी मागणी अशोकस्तंभ न्याय समितीने पालिकेकडे केली आहे. यासाठी समितीने शहरातील सर्व नगरसेवकांना पत्र लिहून यावर लवकरच तोडगा काढण्याची विनंती केली आहे. (प्रतिनिधी)