Join us

संस्कृती जोपासणारी ‘अष्टविनायक’

By admin | Published: July 05, 2017 6:56 AM

वाहनांसाठी पार्किंग, लहान मुलांसाठी मैदान, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, बगिच्यात विविध झाडे, पुरेसे प्रकाशदिवे आणि पाण्याची उत्तम सोय

सागर नेवरेकर/ लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वाहनांसाठी पार्किंग, लहान मुलांसाठी मैदान, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, बगिच्यात विविध झाडे, पुरेसे प्रकाशदिवे आणि पाण्याची उत्तम सोय अशा सेवा-सुविधांनी नटलेली कांदिवली पूर्वेकडील म्हाडा कॉलनीतील ५८ क्रमांकाची अष्टविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था दिमाखात उभी आहे. या सोसायटीत मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून सांस्कृतिक वारसाही जपण्यात येतो. विशेष म्हणजे या सोसायटीची ओळख ‘तंटामुक्त सोसायटी’ म्हणूनही होत आहे.अष्टविनायक सोसायटी सांस्कृतिक वारसा जपणारी सोसायटी म्हणूनही परिचित आहे. सोसायटीतील इमारती २४ मजली असून, एकूण ८ विंग आहेत. प्रत्येक विंगमध्ये ९४ कुटुंबे वास्तव्यास आहेत. सोसायटीत एकूण ७५० कुटुंबे वास्तव्याला आहेत. सोसायटीची स्थापना २०१३ या वर्षी झाली. सोसायटीत एक बाग असून, सुमारे १०० झाडांची लागवड करण्यात आली आहे. आणखी काही शोभिवंत झाडांची लागवड करण्यात येणार आहे. सोसायटीच्या आवारात गणपतीचे मंदिर, मुलांना खेळण्यासाठी मैदान तसेच गणेशोत्सव मंडळाच्या मंचाची व्यवस्था आहे. १८ सुरक्षारक्षक सोसायटीच्या कामासाठी सदैव कार्यरत असतात. तसेच सोसायटीत ९६ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. सोसायटीत ८ इमारतींचे मिळून ‘अष्टविनायक प्रतिष्ठान मंडळ’ स्थापन करण्यात आले आहे. मंडळाच्या उपक्रमांत सर्व रहिवासी एकत्र येतात. मोठ्या उत्साहात सर्व सण साजरे केले जातात. गुढीपाडव्याची मोठी मिरवणूक काढली जाते. १५ आॅगस्ट आणि २६ जानेवारी हे राष्ट्रीय सण साजरे केले जातात. दिवाळीत सोसायटीतील सर्व इमारतींना एकाच प्रकारची रोशणाई केली जाते. त्यामुळे सोसायटीची एक वेगळी छाप परिसरात उमटते. दिवाळीत सामूहिक फराळाचा आनंद घेतला जातो. गणेशोत्सव सण भक्तिभावाने साजरा केला जातो. गणेशोत्सवात महिलांचा मोठा सहभाग असतो. या दिवसांत महिलांचे मंगळागौरीचे खेळ सोसायटीच्या आवारात रंगतात. लहान मुलांसाठी शालेय स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धेसह विविध खेळांचेही आयोजन केले जाते. सोसायटीमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टा उभारण्यात आला आहे. या कट्ट्यावर ज्येष्ठ नागरिकांच्या गप्पांचा फड रंगतो. सोसायटीमध्ये वाचनालय, अभ्यासिका आणि मुलांसाठी व्यायामशाळा सुरू करण्याचा रहिवाशांचा मानस आहे. सोसायटीत ओला आणि सुका कचरा असे कचऱ्याचे विभाजन केले जाते. विशेष म्हणजे प्रत्येक इमारतीच्या मजल्यावर कचऱ्यासाठी ‘गारबेज डक’ची सुविधा करण्यात आलेली आहे. या डकद्वारे सर्व रहिवासी कचरा टाकतात. तो कचरा तळमजल्यावर जमा होतो. त्यानंतर सफाई कर्मचारी कचऱ्याचे ओला आणि सुका कचऱ्यात वर्गीकरण करून ते महापालिकेच्या घंटागाडीत पाठवतात. सोसायटीला महापालिकेचे पाणी वापरासाठी मिळते. पाणी वेळेनुसार सोडले जाते. पाण्याविषयी आवश्यक जनजागृतीही केली जाते. त्यामुळेच ही सोसायटी टँकरमुक्त आहे. शौचालयाच्या पाण्यावर प्रक्रिया करून ते अन्य कामांसाठी वापरले जाते. इकोफे्रण्डली होळी साजरी केली जाते. होळीमध्ये नैसर्गिक रंगांचा वापर केला जातो. लहान मुलांसाठी संस्कार केंद्र चालू करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच सौरऊर्जा प्रकल्पदेखील लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे. सोसायटीत पार्किंगची उत्तम व्यवस्था आहे. प्रत्येक कुटुंबाला एका पार्किंगची सोय करून देण्यात आलेली आहे. इमारतीच्या आतील भागात चारचाकी वाहनांची पार्किंग आहे. इमारतीच्या बाहेरील आवारात दुचाकी वाहनांचे पार्किंग केले जाते. सोसायटीच्या मोकळ्या जागेत व्यायामशाळा सुरू करण्यासाठी स्थानिक नगरसेवकांकडे पाठपुरावा करण्यात आलेला आहे. तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पावर काम सुरू आहे.सामाजिक उपक्रमांचे आयोजनसोसायटीमार्फत वेगवेगळ्या रोगांवर जनजागृतीही केली जाते. सोसायटीतील समस्या महापालिकेच्या संकेतस्थळावर मांडल्या जातात. लहान मुलांचे आणि महिलांचे लेजीम पथक आहे. प्रत्येक सणाच्या वेळी लेजीम पथकाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. कौटुंबिक सहलीचेदेखील आयोजन केले जाते. सोसायटीच्या ८ विंगमधून ५ सभासद निवडून कमिटी स्थापन करण्यात आली आहे. कमिटीमार्फत सोसायटीची देखभाल केली जाते. रहिवाशांशी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून आणि नोटीस बोर्डच्या साहाय्यानेदेखील संवाद साधला जातो. तसेच आठवड्याला सर्व सभासदांची बैठक घेतली जाते. या बैठकीत काही आवश्यक विषयांवर चर्चा केली जाते.