मुंबई : गेली दीड वर्षे भारतासह जग कोरोनाशी लढा देत आहे. मात्र, याबद्दल अचूक व अभ्यासपूर्ण माहिती असणाऱ्या लेखांचा संग्रह असणारे लेखक व माजी आरोग्य राज्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी लिहिलेले कोरोनाचे वास्तववादी भाष्य करणारे ‘मळम कोरोनाचे’ पुस्तक आहे, अशा शब्दांत राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी गौरवोद्गार काढले.
विलेपार्ले पूर्व येथील उत्कर्ष मंडळ हॉलमध्ये कोरोनाचे नियम पाळत, त्यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी मंचकावर प्रमुख पाहुणे म्हणून ‘लोकमत’चे संपादक विनायक पात्रुडकर, तर विशेष अतिथी म्हणून माजी खासदार व ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत, तर डॉ.दीपक सावंत, इंकिंग इनोव्हेशन प्रकाशनाचे आनंद लिमये यावेळी उपस्थित होते.
आशुतोष कुंभकोणी म्हणाले की, कोरोना महामारीबद्दल वाचक जास्तीतजास्त माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत असताना, कोरोनाचा उगम, फैलाव याची अचूक माहिती या पुस्तकात आहे.
समाजात जागरूकता, सजगता विशद करणारे आणि मुद्देसूद असलेले हे अभ्यासपूर्ण, वाचनीय पुस्तक आहे, तसेच अमेरिका, लंडन, व्हिएतनाम आणि इतर देशांत कोरोनाची परिस्थिती काय आहे, यावर त्यांनी या पुस्तकात भाष्य केले आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे आणि त्या करताना कोणते प्रयोग फसले आहेत, यावर या पुस्तकात माहिती आहे. विविध भाषांत या पुस्तकाचा अनुवाद झाला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
‘लोकमत’चे संपादक विनायक पात्रुडकर म्हणाले की, कोरोनाचा दीड वर्षाचा काळ आणि आठवणी खूप कटू होत्या. सोशल मीडियावर कोरोनाबद्दल अनेक माहिती येत असताना, लेखक डॉ.दीपक सावंत यांनी जगभरातून योग्य माहिती घेऊन समान्य माणसाला समजेल, असे अचूक लिखाण करून विश्वासार्हता या पुस्तकात विशद केली आहे.
माजी खासदार व ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत म्हणाले की, आजच्या पिढीला हे पुस्तक म्हणजे ठेवा आहे. विविध भाषांत भाषांतर करून, या पुस्तकांच्या आवृत्या डॉ.दीपक सावंत यांनी काढल्या पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.
या पुस्तकात लेखक डॉ.दीपक सावंत यांनी कोरोनाचा प्रवास या पुस्तकात रेखाटला असून, मुंबई व महाराष्ट्रात कोरोना कसा आटोक्यात आला, या विषयी त्यांनी यांनी भाष्य केले आहे.