मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नवे सरकार स्थापन झाल्यावर त्याच दिवशी मुंबई मेट्रोचे कारशेड आरेमध्येच करण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. यावरून पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे असतानाच आता एक महत्वाची माहिती समोर येत आहे.
मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे याच्यांकडे मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदाच्या अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. याबाबत अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी यांसदर्भातील पत्रक काढले आहे.
अश्विनी भिडे यांच्याकडे याआधी फडणवीस सरकारच्या काळातही ही जबाबदारी होती. मात्र, सत्तांतरानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकासआघाडी सरकार आल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली. डिसेंबर महिन्यात शिवसेना आणि अश्विनी भिडे यांच्यात आरे कारशेडच्या मुद्द्यावरुन मतभेद झाले होते. त्यानंतर त्यांना करोना विषाणू व्यवस्थापन समितीत सहभागी करुन घेण्यात आलं होतं. त्यानंतर २०२० साली त्यांना मुंबई महापालिकेचं अतिरिक्त आयुक्तपद देण्यात आलं होतं.
दरम्यान, मुंबईतील आरे कारशेडमधील वृक्षतोडीवरून वाद झाल्यानंतर मेट्रो-3 च्या संचालक असलेल्या अश्विनी भिडे यांना शिवसेनेने टीकेचे लक्ष्य केले होते. आरे येथील कारशेड अन्यत्र हलविल्यास प्रकल्पच होणार नसल्याची भूमिका मेट्रो प्रशासनाने घेतली होती. त्यावेळी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी अश्विनी भिडेंवर जोरदार टीका केली होती.
अश्विनी भिडे व त्यांच्या अन्य अधिकाऱ्यांना ‘आरे’च्या कारशेडशिवाय मेट्रो प्रकल्प पूर्ण करता येणार नसेल तर अशा अधिकाऱ्यांना बाजूला करावे. त्यांच्या जागी सक्षम व मुंबईकरांना विश्वासात घेऊन काम करणाऱ्यांकडे प्रकल्प द्यावा, अशी मागणीही आदित्य ठाकरेंनी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.