मुंबई : काही रिक्षाचालक दुपट्ट तिप्पट भाडे आकारून प्रवाशांना लुटतात, परंतु एका प्रवाशाकडे पाचपट भाडे मागणे रिक्षाचालकाला चांगलेच भोवले असून, पोलिसांनी त्याच्यावर तासाभरात कारवाई केली आहे. या कारवाईबद्दल मुंबई पोलिसांचे कौतुक केले जात आहे.
एक प्रवाशी शुक्रवारी विमानतळ रोड या मेट्रो स्थानकापासून विमानतळाला जात होता. या वेळी त्यांनी एमएच ०३ १२१८ या क्रमाकांची रिक्षा केली. या रिक्षाचालकाने प्रवाशाला घाटकोपरच्या विमानतळ रोड या मेट्रो स्थानकावरून विमानतळावर पोहोचल्यानंतर पाचपट भाडे मागितले. या प्रवाशाने रिक्षाचा फोटो काढला आणि रिक्षाचालकाविरोधात तक्रार दाखल करण्याच्या धाक दाखविला. तक्रारीच्या भीतीने रिक्षाचालकाने अखेर शंभर रुपये मागितले. प्रवाशाने या रिक्षाचा फोटो आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केला. याशिवाय मुंबई पोलिसांना टॅग करून तक्रार केली. मुंबई पोलिसांनी तातडीने या तक्रारीची दखल घेतली. पोलिसांनी या मुजोर रिक्षाचालकावर तासाभरात कारवाई केली. तक्रार केल्यानंतर ५५ मिनिटांनी मुंबई पोलिसांनी टिष्ट्वटला उत्तर देताना ईचलन नंबर शेअर केला. काही मुजोर रिक्षाचालक सर्रासपणे दुप्पट-तिप्पट भाडे आकारतात. प्रवाशांनी देण्यास नकार दिला तर ते जाण्यास नकार देतात. या रिक्षाचालकांकडे प्रवासी दुर्लक्ष करतात. रिक्षाचालकांच्या मुजोरीला बळकटी येते.