Join us  

पगाराच्या मागणीसाठी विश्वस्तांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 4:07 AM

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलातील नाट्यगृहाचे व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या मागणीसाठी, ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलातील नाट्यगृहाचे व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या मागणीसाठी, नाट्य परिषदेच्या कोथरूड (पुणे) शाखेचे अध्यक्ष व नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाचे सदस्य सुनील महाजन यांनी नाट्य परिषदेचे विश्वस्त शरद पवार यांना पत्र पाठवून साकडे घातले आहे.

नाट्यगृहाचे व्यवस्थापक व कर्मचारी यांचे पगार न झाल्याने त्यांचे कुटुंब आर्थिक अडचणींना तोंड देत असून, सध्याच्या संकटकाळात विश्वस्त या नात्याने या विषयात लक्ष घालून त्यांना कशाप्रकारे सहकार्य करता येईल, या संदर्भात मार्गदर्शन करावे; अशी विनंती त्यांनी या पत्राद्वारे केली आहे. १७ व १८ मे रोजी झालेल्या पावसामुळे या नाट्यगृहामध्ये गळती सुरू झाली आहे; त्यामुळे नाट्यगृहाची अवस्था आणखी वाईट होत चालली आहे. त्या संदर्भातही काम करण्यासाठी सूचना द्याव्यात, अशी विनंतीही सुनील महाजन यांनी विश्वस्तांना केली आहे. तसेच, नाट्य परिषदेचे पदाधिकारी व नियामक मंडळ सदस्य यांच्यात चाललेला आरोप-प्रत्यारोपाचा खेळ लवकर संपवून या सर्व कामास कशी उभारी देता येईल, या संदर्भातही त्यांनी मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली आहे.

दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या संदर्भात सदर नाट्यगृहाचे व्यवस्थापक सुनील कदम यांच्याशी संपर्क साधला असता, गेल्या मे महिन्यापासून आमचा पगार कमी केला गेला आणि यंदाच्या फेब्रुवारी महिन्यापासूनचा पगार पूर्णतः थकला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

-------------------------------------------------------------------------------------------------------------