मुंबई : चीनची घुसखोरी, इंधन दरवाढ, कोरोना संकट हाताळण्यात आलेले अपयश अशा मुद्यांवर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, खा. राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला जाब विचारल्यामुळेच काँग्रेस विचाराच्या संस्थांची चौकशी करण्यात येत आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला.केंद्र सरकार ईडीचा वापर करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. राहुल गांधी यांनी चीनची घुसखोरी, २० जवानांचे बलिदान, इंधन दरवाढ या मुद्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला जाब विचारला. परंतु या सरकारला विरोधकांनी प्रश्न विचारलेले चालत नाहीत. लोकशाहीवर यांचा विश्वासच नाही. फक्त विरोधकांचा आवाज बंद करण्यासाठी दडपशाहीचा, दहशतीचा मार्ग अवलंबायचा हीच भाजप सरकारची नीती राहिली आहे. भाजपच्या या दहशतीला, दडपशाहीला काँग्रेस जुमानत नसून राष्ट्रहितासाठी, जनतेचे प्रश्न घेऊन काँग्रेसचे नेते यापुढेही संघर्ष करतच राहतील, असा इशाराही त्यांनी दिला.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर येथील राजगृह निवासस्थानाची समाजकंटकांनी केलेली तोडफोड अत्यंत निषेधार्ह आहे. राजगृह आमचे प्रेरणास्थळ आहे. राजगृहावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा त्यांनी निषेध केला. हल्लेखोरांना तात्काळ अटक करावी व कठोर शासन करावे, असे थोरात म्हणाले.
केंद्राला जाब विचारल्याने संस्थांची चौकशी - थोरात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2020 6:45 AM