मुंबई : राज्यातील बंदरांमध्ये येणारा प्रत्येक प्रवासी, जहाजांतील व मालवाहतूक करणाऱ्या जहाजांतील प्रवासी व कर्मचाऱ्यांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चीन व जवळील परिसरातून महाराष्ट्रात येणाऱ्या जहाजांमधील प्रवासी, कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती वस्त्रोद्योग, मत्स्यसंवर्धन व बंदरविकास मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली.
कोरोना हे केवळ देशासमोरील नव्हेतर, जगासमोरील मोठे आव्हान आहे. जहाजाद्वारे आलेल्या कर्मचाºयांना व प्रवाशांना तपासणी करून परत जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बाहेरील कर्मचारी व प्रवाशांनी शहरात प्रवास करण्याऐवजी त्यांनी तपासणी झाल्यावर परत जावे, असे निर्देश देण्यात आल्याचे शेख यांनी स्पष्ट केले.
जर कर्मचारी किंवा प्रवासी देशातील असतील तर त्यांची तपासणी झाल्यावर त्यांना घरी सोडण्यात येईल. राज्यातील जवळपास प्रत्येक बंदरामध्ये तपासणी करण्याची सुविधा पुरविण्यात आल्याची माहिती शेख यांनी दिली. जलमार्गाने येणाºया प्रवाशांना शहरात आणण्याऐवजी त्यांना परत पाठवून देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे ते म्हणाले.