Join us

मुस्लिम समाजासाठी लवकरच आरक्षण लागू करणार, अस्लम शेख यांनी दिले संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2020 1:42 PM

मुस्लीम समाजातील  मागासलेल्या जातींच्या प्रगतीसाठी आरक्षण अत्यंत गरजेचे

मुंबई - मुस्लीम समाजातील  मागासलेल्या जातींच्या प्रगतीसाठी आरक्षण अत्यंत गरजेचे आहे. महाविकास आघाडीचे सरकार लवकरच याबाबतीत सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यसंवंर्धन व बंदरविकासमंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री ना.अस्लम शेख यांनी केले. ना. शेख पुढे म्हणाले की, कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे सरकार असताना मुस्लीमांना ५%  आरक्षण देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला होता. त्यांनंतर काही लोक या निर्णयाच्या विरोधात कोर्टात  गेले. कोर्टानेही मुस्लीम आरक्षणा संदर्भात सकारात्मक निर्णय देताना मुस्लीम समाजातील मागास जातींना आरक्षणाची गरज असल्याचे म्हटले होते.

महाविकास आघाडी सरकारच्या किमान समान कार्यक्रमातदेखील मुस्लीम आरक्षणाचा समावेश करण्यात आल्याने लवकरच मुस्लीम आरक्षणासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे संकेत  शेख यांनी दिले.मतांच्या ध्रुविकरणाचे राजकारण करणाऱ्या पक्षाने जाणीवपूर्वक मुस्लीम आरक्षणावर निर्णय घेतला नसल्याने मुस्लीम समाज आरक्षणापासून वंचित राहिला असल्याची टीका शेख यांनी भारतीय जनता पार्टीचे नाव न घेता केली. आरक्षणामुळे मुस्लीम समुदायामधील मागासलेल्या जातींना मुख्य प्रवाहात येऊन स्वत : चा विकास करुन घेता येणार आहे, असेही शेख शेवटी म्हणाले.

टॅग्स :आरक्षणमुस्लीम