Join us

दक्षिण मुंबईतील एस्प्लेंड मेन्शन इमारत १५ मेपर्यंत म्हाडा करणार रिकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 5:06 AM

रहिवाशांनी सहकार्य न केल्यास पोलीस बळाचा वापर; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाईबाबत पाठवली नोटीस

मुंबई : दक्षिण मुंबईतील अतिधोकादायक ठरवण्यात आलेली एस्प्लेंड मेन्शन इमारत १५ मेपर्यंत रिकामी करण्यात येणार असल्याचे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. रहिवाशांनी इमारत रिकामी करण्यास सहकार्य केले नाही तर पोलीस बळाच्या साहाय्याने त्यांना बाहेर काढण्यात येणार असल्याचेही त्यांंनी स्पष्ट केले.म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळातर्फे मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींचे दरवर्षी पावसाळापूर्व सर्वेक्षण करण्यात येते. या सर्वेक्षणात दक्षिण मुंबईतील एस्प्लेंड मेन्शन ही इमारत गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी धोकादायक ठरवण्यात येत आहे. इमारतीमधील रहिवासी बाहेर पडत नसल्याचा वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे.मुंबईमध्ये म्हाडाच्या १४ हजारांवर उपकरप्राप्त इमारती आहेत. यामध्ये दीडशे वर्षांपूर्वीच्या एस्प्लेंड मेन्शनचाही समावेश आहे. या इमारतीमध्ये व्यापारी गाळे, हॉटेलप्रमाणेच कार्यालयांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून निवासी भाडेकरू कमी आहेत. म्हाडाने २००८ मध्ये ही इमारत धोकादायक असल्याचे जाहीर केले होते. त्या वेळी काही रहिवाशांनी अन्यत्र स्थलांतर केले, मात्र काही रहिवाशांनी इतरत्र न जाता इमारतीमध्येच राहण्याचा निर्धार केला. आपले घर सोडले तर संक्रमण शिबिरामध्येच वर्षानुवर्षे राहावे लागेल, असा त्यांचा समज आहे. उच्च न्यायालयाने ही इमारत अतिधोकादायक असल्याने १५ मेपर्यंत रिकामी करण्याचे आदेश नुकतेच दिले. या आदेशानंतर म्हाडाने त्याबाबत जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.म्हाडाच्या विधि विभागामार्फत न्यायालयीन आदेशाची प्रत प्राप्त होताच या इमारतीला नोटीस पाठवण्यात येणार आहे. सोबतच म्हाडाकडून मुंबई पोलिसांकडे अधिकृतपणे इमारत रिक्त करण्यासाठी साहाय्य पुरवण्याचे विनंती करणारे पत्र पाठवण्यात येणार आहे. त्या पत्राच्या आधारे मुंबई पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कारवाईचे स्वरूप लक्षात घेत किती प्रमाणात पोलीस बंदोबस्त लागेल, त्याचा आढावा घेण्यात येईल. पोलीस बंदोबस्त पुरवताना म्हाडाकडून त्याचे नियमानुसार शुल्क देण्यात येईल. यामुळे भाडेकरूंनी इमारत रिकामी करण्यास विरोध दर्शवल्यास पोलीस बळाच्या साहाय्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार म्हाडास मिळणार असल्याचे अधिकाºयांनी स्प्ष्ट केले.अशी होणार कारवाईएस्प्लेंड मेन्शन इमारतीत अजूनही राहणाºयांना म्हाडाच्या ए वॉर्डाकडून नोटीस पाठवण्यात येईल. नोटिसीमध्ये १५ मेपर्यंत इमारत रिकामी करण्याची सूचना देण्यात येणार आहे. नोटीस प्राप्त होताच सर्वच भाडेकरूंनी इमारत तत्काळ रिकामी केल्यास पुढील कारवाई टळणार आहे. मात्र नोटिसीनुसार अंमलबजावणी न झाल्यास म्हाडास पोलिसांचे साहाय्य घेऊन कारवाई करावी लागणार असल्याचे म्हाडामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.एस्प्लेंड मेन्शन इमारतीतील राहते घर सोडले तर संक्रमण शिबिरात वर्षानुवर्षे राहावे लागेल, अशी भीती रहिवाशांना आहे. त्यामुळे इमारत धोकादायक जाहीर होऊनही अनेक जण जीव मुठीत घेऊन येथेच राहत आहेत.

टॅग्स :म्हाडा