Join us

नवी मुंबईत 'आसाम भवन' अन् आसाममध्ये 'महाराष्ट्र भवन'; एकनाथ शिंदेंची गुवाहाटीतून घोषणा

By मुकेश चव्हाण | Published: November 27, 2022 2:04 PM

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या गुवाहाटी दौऱ्यावर असून त्यांच्यासह आलेले आमदार, खासदार, पदाधिकारी यांची सारी व्यवस्था आसाम सरकारने केली होती.

मुंबई/नवी दिल्ली- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा यांनी रेडिसन ब्लु हॉटेलमध्ये आज सदिच्छा भेट घेतली. या भेटीमध्ये महाराष्ट्र आणि आसाम राज्यामध्ये परस्पर संबंध अधिक दृढ व्हावेत तसेच या दोन राज्यात उद्योग, व्यापार, पर्यटनात वाढ व्हावी यासाठी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.  

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या गुवाहाटी दौऱ्यावर असून त्यांच्यासह आलेले आमदार, खासदार, पदाधिकारी यांची सारी व्यवस्था आसाम सरकारने केली होती. तसेच राज्यात सत्ता स्थापना झाल्यावर पुन्हा एकदा गुवाहाटीला येण्याची विनंती देखील केलेली होती. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिलेदारांनी कामाख्या देवीचे दर्शन घेतल्यानंतर आज मुख्यमंत्री सरमा यांनी या सर्वांसाठी खास प्रीतीभोजनाचे आयोजन केले होते. यावेळी सरमा यांनी राज्यातील आमदार, खासदार आणि त्यांच्या कुटूंबियांची आस्थेने विचारपूस केली.

तब्बल दोन तास हा कार्यक्रम सुरू होता. यावेळी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या काळात केलेल्या मदतीबद्दल आभार मानताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांना खास गणपतीची मूर्ती देऊन त्यांचा सन्मान केला. तसेच आता एकदा महाराष्ट्राचा पाहुणचार स्वीकारण्यासाठी सरमा यांनी नक्की यावे असे सांगून त्यांना महाराष्ट्र भेटीचे निमंत्रणही दिले. तसेच या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधत एक मोठी घोषणा केली. 

आसाममध्ये कामाख्या देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लोकांची सोय व्हावी यासाठी महाराष्ट्र भवन बांधण्याची चर्चा झाली. तसेच नवी मुंबईत आसाम भवनसाठी जागा देणार असल्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली. तसेच महाराष्ट्र आणि आसाम या दोन राज्यांच्या संस्कृतीत अनेक साम्यस्थळं असून ही दोन राज्य सांस्कृतिकदृष्ट्या एकमेकांच्या जवळ यावी यासाठी आसाममध्ये 'छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन' उभारण्यात येणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. 

गुवाहाटी दौऱ्याला ११ जणांची दांडी-

कृषी मंत्री अब्दुल सत्तार, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील हे अनुपस्थित राहिले. सत्तारांनी कृषी प्रदर्शन, तानाजी सावंतांनी आरोग्य शिबिर, गुलाबराव पाटील यांनी दूध संघ निवडणूक, शंभूराज देसाई यांनी लग्नकार्याचे कारण दिले. त्याचप्रमाणे आमदार महेश शिंदे, चंद्रकांत पाटील, अनिल बाबर, संजय गायकवाड, खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने, श्रीरंग बारणे यांनीही अनुपस्थितीचे वैयक्तिक कारण दिले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :एकनाथ शिंदेमहाराष्ट्र सरकारआसाम