मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाच्या सरी कोसळत असतानाच मागील २४ तासांत गोरेगाव येथे सर्वाधिक २२२.८० मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान खात्याने सांगितले. तर बोरीवली २१८.२०, दादर २१६.८०, कांदिवली १९५.६०, वरळी १८४.४, चेंबूर १८०, बोरीवली १८०, मालाड १७४, पवई १५६, मुलुंड १५६, कुलाबा १४५, कांदिवली १४७, वांद्रे १३९, सांताक्रूझ १३६, जोगेश्वरी १२५, चारकोप १२२ मिलीमीटर पाऊस पडला.मुंबई शहरात हिंदमाता, परळ, गांधी मार्केट, सायन येथील मुख्याध्यापक भवन, सायन रोड क्रमांक २४, सायन येथील हेमंत मांजरेकर मार्ग, अॅण्टॉप हिल येथील सेक्टर नंबर ६, वरळी येथील ना.म. जोशी मार्ग, चेंबूर येथील शेल कॉलनी, चेंबूर येथील पोस्टल कॉलनी, कुर्ला पश्चिमेकडील बैलबाजार आणि शीतल सिनेमागृह, गोरेगाव येथील सिद्धार्थनगर, वांद्रे येथील नॅशनल कॉलेज, सांताक्रूझ येथील मिलन सबवे, तसेच वांद्रे येथील कपाडिया नगर येथे पावसाचे पाणी साचले. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला. परिणामी जनजीवनही विस्कळीत झाले.मुंबई शहरात १, पूर्व उपनगरात ४ आणि पश्चिम उपनगरात ८ अशा एकूण १३ ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळल्याच्या घटना घडल्या. शहरात २१, पूर्व उपनगरात ६ आणि पश्चिम उपनगरात ८ अशा एकूण ३५ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या.शहरात १६, पूर्व उपनगरात ४, पश्चिम उपनगरात १८ अशा एकूण ३८ ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने यात मनुष्यहानी झाली नाही.अतिवृष्टीचा इशारा११ ते १३ जुलैदरम्यान रायगड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडेल, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल.१४ जुलै रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी होईल, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागानेवर्तवला आहे.दरम्यान, अरबी समुद्राहून ४० ते ६० प्रतितास किलोमीटर वेगाने वारे वाहत असून, हा वेग पुढील पाच दिवस कायम राहील, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात उतरू नये, असा इशारा हवमान खात्याने दिला आहे.बेस्ट बसचे मार्ग बदललेमुंबई शहरासह उपनगरात साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे कुर्ला येथील साकीनाका, बैलबाजार, काळे रोड, माटुंगा येथील गांधी मार्केट, सायन रोड क्रमांक २४, एस.व्ही. रोड येथील वांद्रे टॉकीज, हिंदमाता, समाजमंदिर हॉल, अॅण्टॉप हिल येथील सेक्टर क्रमांक ७, किडवई मार्ग, एन.एम. जोशी मार्ग, मिलन सबवे, फितवाला रोडवरील बेस्ट बसच्या वाहतुकीचे मार्ग वळविण्यात आले होते.
मुंबईकरांवर अस्मानी संकट, गोरेगावात सर्वाधिक २२२.८० मिलीमीटर नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 6:20 AM