नवी मुंबई : विविध उपचारांसाठी आसाम येथून मुंबईत येणा-या रुग्णांच्या मदतनिधीत वाढ करण्याची घोषणा आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी केली. वाशी येथील आसाम भवनला बुधवारी त्यांनी भेट दिली. यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.नोकरी अथवा उपचारानिमित्ताने मुंबईत येणाऱ्या आसामच्या नागरिकांसाठी वाशी येथे आसाम भवन उभारण्यात आले आहे. सध्या तेथे मोठ्या प्रमाणात आसामी नागरिकांचे वास्तव्य आहे. त्यामध्ये बहुतांश नागरिक हे विविध उपचारानिमित्ताने आसाममधून मुंबईत आलेले आहे. आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी बुधवारी या नागरिकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आसाममधील वाढत्या कर्करोग रुग्णांची दखल घेत वाशीतील आसाम भवनमधील दोन मजले केवळ कर्करोग रुग्णांसाठी आरक्षित ठेवण्याची घोषणा केली. यामुळे उपचारासाठी मुंबईत आलेल्या आसामच्या कर्करोग रुग्णांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयाने कर्करोग रुग्णांसाठी आरक्षित झालेले आसाम भवन ही देशातील एकमेव सरकारी वास्तू ठरली आहे. त्याशिवाय विविध उपचारांसाठी आसाम सरकारकडून मिळणाऱ्या निधीतही वाढ करण्याची घोषणा गोगोई यांनी केली. पुरेशा आर्थिक सहकार्याअभावी रुग्णांच्या उपचारात येणारा अडथळा टाळण्याच्या उद्देशाने त्यांनी हा निर्णय घेतला. नोकरीनिमित्ताने आसाममधून आलेले नागरिक मुंबईतही मोठ्या उत्साहात सण साजरा करून संस्कृती जतन करत असल्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)
आसामी रुग्णांच्या निधीत वाढ करणार
By admin | Published: February 26, 2015 1:10 AM