Join us

मोदींच्या हत्येचा कट ही तर निव्वळ अफवा, संजय निरुपम यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2018 11:57 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट ही तर निव्वळ अफवा आहे. मोदींच्या लोकप्रियतेत घट होते तेव्हा लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी भाजपाकडून त्यांच्या हत्येच्या कटाची बातमी पेरली जाते, असा गंभीर आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट ही तर निव्वळ अफवा आहे. मोदींच्या लोकप्रियतेत घट होते तेव्हा लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी भाजपाकडून त्यांच्या हत्येच्या कटाची बातमी पेरली जाते, असा गंभीर आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे.कोरेगाव भीमा प्रकरणात अटक केलेल्या पाच आरोपींना गुरुवारी न्यायालयासमोर हजर करून सरकारी पक्षाने त्यांचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा युक्तिवाद केला. इतकेच नव्हेतर, राजीव गांधी यांच्या हत्येप्रमाणे देशात पुन्हा आत्मघातकी हल्ला करण्याच्या दृष्टीने नक्षलवादी नेते विचार करीत आहेत, असा उल्लेख असलेले नक्षलवादी चळवळीतील बड्या नेत्याचे पत्र या आरोपींकडील दस्तऐवजात पोलिसांना सापडल्याचा गौप्यस्फोट सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी गुरुवारी पुण्याच्या न्यायालयात केला. अ‍ॅड. पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा थेट उल्लेख केलेला नसताना माध्यमांत ‘मोदींच्या हत्येचा कट’ अशा प्रकारच्या बातम्या आल्या आहेत. निरुपम म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हापासून त्यांची जुनी एक टॅक्टिक आहे. जेव्हा जेव्हा त्यांची लोकप्रियता घटते तेव्हा तेव्हा ते अशा प्रकारच्या बातम्या पेरतात. त्यामुळे आताही पंतप्रधान म्हणून त्यांची लोकप्रियता झपाट्याने कमी होत आहे, तर राहुल गांधी यांना जनसमर्थन मिळू लागताच भाजपाच्या पायाखालची वाळू निसटू लागली आहे. देशभर भाजपाचा जनाधर कमी होत चालला आहे. आताच्या मोदींच्या हत्येच्या कटाबाबत मी काही खात्रीने सांगू शकत नाही; मात्र मोदींचा आतापर्यंतचा व्यवहार पाहता त्यास शंकेस नक्कीच वाव आहे असे निरुपम यांनी म्हटले आहे. तसेच मोदींच्या हत्येचा कट या घटनेची चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.

टॅग्स :संजय निरुपम