Join us  

वृद्धेची हत्या करणारा सुरक्षारक्षक अटकेत

By admin | Published: March 05, 2016 3:32 AM

ओशिवरा येथील रिजवान अपार्टमेंटमध्ये मुमताज रशीद बादशाह (७०) या वृद्धेची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी ओशिवरा पोलिसांना शुक्रवारी एका सुरक्षारक्षकाला अटक करण्यात यश आले.

मुंबई : ओशिवरा येथील रिजवान अपार्टमेंटमध्ये मुमताज रशीद बादशाह (७०) या वृद्धेची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी ओशिवरा पोलिसांना शुक्रवारी एका सुरक्षारक्षकाला अटक करण्यात यश आले. नोकरी जाईल आणि ठरलेले लग्नही मोडेल या भीतीने त्याने बादशाह यांना ठार मारल्याची कबुली पोलिसांकडे दिली. याबाबत अधिक चौकशी सुरू आहे. मोहम्मद रफी उर्फ रफिक वाली मोहम्मद चौधरी (२५) असे अटक करण्यात आलेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. मोहम्मद चौधरी हा गेल्या दोन वर्षांपासून मुमताज बादशाह राहत असलेल्या रिजवान अपार्टमेंटमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. कामात चालढकल आणि आळशीपणा करणाऱ्या चौधरीला सोसायटीतील लोक कंटाळले होते. त्यामुळे त्यांनी सोसायटीच्या सुरक्षेसाठी नवीन सुरक्षा एजन्सीची नेमणूक केली. चौधरीचे लग्न ठरल्याने आणि अशा परिस्थितीत नोकरी गेली तर ठरलेले लग्नही मोडेल याची त्याला भीती वाटत होती. त्यामुळे नवीन सुरक्षा एजन्सी ही सोसायटीच्या कामात सक्षम नसल्याचे सिद्ध करायचे आणि त्यासाठी या ठिकाणी काही तरी घातपात घडवून आणायचा, असे त्याने ठरविले. त्यासाठी मुमताज यांनाच मोहम्मद याने लक्ष्य केले. हत्या झाल्याच्या दिवसापासून चौधरी गायब होता. तसेच इमारतीत येता-जाताना त्याच्या हालचाली सीसीटीव्ही फुटेजमध्येदेखील संशयास्पद वाटत होत्या. त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावला, अशी माहिती ओशिवरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि तपास अधिकारी परमेश्वर गणमे यांनी दिली.