आव्हाड यांच्या बंगल्यावरील मारहाण प्रकरण; ‘सीबीआयकडे प्रकरण वर्ग करू शकत नाही’ - राज्य सरकार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 01:30 PM2022-04-22T13:30:32+5:302022-04-22T13:31:22+5:30
ठाण्याचे रहिवासी अनंत करमुसे यांची याचिका दाखल करून घेण्यावर सरकारतर्फे महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी आक्षेप घेतला. तसेच या प्रकरणातील आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
मुंबई : गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर झालेल्या मारहाणप्रकरणी आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आरोप निश्चितीही करण्यात आली आहे. तपास पूर्ण झाल्याने आता हा तपास सीबीआयकडे वर्ग करू शकत नाही, अशी भूमिका राज्य सरकारने उच्च न्यायालयात घेतली.
ठाण्याचे रहिवासी अनंत करमुसे यांची याचिका दाखल करून घेण्यावर सरकारतर्फे महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी आक्षेप घेतला. तसेच या प्रकरणातील आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आरोप निश्चितीही करण्यात आली आहे. तपास पूर्ण झाल्याने आता हा तपास सीबीआयकडे वर्ग करू शकत नाही, असे कुंभकोणी यांनी न्या. पी. बी. वराळे व न्या. एम. एस. मोडक यांच्या खंडपीठाला सांगितले. त्यावर करमुसे यांचे वकी सुभाष झा यांनी आक्षेप घेतला. ‘ठाण्यातील वर्तक नगर पोलीस ठाण्यातून हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी करणारी याचिका २०२० मध्येच दाखल केली आहे. मात्र, कोरोनामुळे या याचिकेवर सुनावणी होऊ शकली नाही. पहिल्यांदा या याचिकेवर सुनावणी होत आहे,’ असा युक्तिवाद झा यांनी केला.
वैद्यकीय अधिकाऱ्याने केलेल्या वैद्यकीय चाचणीचा अहवाल आहे का? अशी विचारणा न्यायालयाने झा यांच्याकडे केली. त्यावर झा यांनी सांगितले की, मारहाणीनंतर याचिकाकर्त्याला पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर प्रथमोपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र, अनेकवेळा विनंती करूनही वैद्यकीय अहवाल देण्यात आला नाही. त्यावर कुंभकोणी यांनी बाजू मांडण्यास काही दिवसांचा अवधी न्यायालयाकडून मागितला. काेर्टाने पुढील आठवड्यात या याचिकेवरील सुनावणी ठेवली.