तरुणीला मारहाण; तरुणाला २५ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 06:51 AM2017-10-23T06:51:54+5:302017-10-23T06:52:00+5:30
मुंबई : तरुणीला अमानुषपणे बेदम मारहाण करणा-या इम्रान शेख याला २५ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
मुंबई : तरुणीला अमानुषपणे बेदम मारहाण करणा-या इम्रान शेख याला २५ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. नेहरूनगर परिसरात त्याने १६ वर्षांच्या युवतीला बेदम मारहाण केल्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावरून व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी शेखला शनिवारी दुस-यांदा अटक करून, त्याच्यावर मारहाणीबरोबरच विनयभंग व बाल अत्याचार प्रतिबंधक कायदा (पॉक्सो)अन्वये कारवाई केली आहे.
नेहरूनगर परिसरातील १६ वर्षांची युवती मंगळवारी क्लासला जात असताना इम्रानने तिची छेड काढून तिला बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण केली होती. पोलिसांनी इम्रानवर केवळ मारहाणीचा गुन्हा दाखल करून अटक केली. मात्र, दोनच दिवसांत तो जामिनावर बाहेर आला. त्यानंतर, मारहाणीच्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल झाल्यानंतर, पोलिसांच्या निष्काळजीपणाबद्दल टीकेची झोड उठली.